अभिनेत्री रविना टंडन, फराह खान जोरजोरात हसल्या अन्‌ गुन्हा दाखल 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

कॉमेडी शोमध्ये बायबलमधील एक पवित्र शब्दाची इंग्रजी स्पेलिंग लिहिण्याचा खेळ खेळण्यात आला. यात कॉमेडियन भारती सिंग हिने स्पेलिंग चुकीची लिहिली. मात्र, अर्थ बरोबर सांगितला. यावर फराहने भारतीला पाच गुण दिले. या उत्तरावर रविना, फराह आणि भारती यांनी जोरात टाळ्या वाजवल्या व जोरजोरात हसल्या. तसेच हिंदूत भाषांतर करताना विनोद केला. यामुळे ख्रिश्‍चन धर्माच्या भावना दुखावल्या गेल्या. 

नागपूर : टीव्हीवरील कॉमेडी शोमध्ये ख्रिश्‍चन धर्मीयांच्या भावना दुखावल्या प्रकरणी सिने अभिनेत्री रविना टंडन, नृत्य दिग्दर्शिका फराह खान आणि कॉमेडियन भारती सिंग यांच्यावर मानकापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 डिसेंबर 2019 रोजी ख्रिस्मसनिमित्त रात्री 8 वाजता सोनी टीव्ही चॅनेलवर बॅक बेंचर्स हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची फराह खान ही होस्ट होती. कार्यक्रमात पाहुणे म्हणून सिने अभिनेत्री रविना टंडन आणि कॉमेडीयन भारती सिंग यांना निमंत्रित केले होते. कार्यक्रम दरम्यान स्पेलिंग एक्‍सपर्ट हा खेळ खेळण्यात आला. या खेळात फराह खान हिने रविना टंडन आणि भारती सिंग यांना बायबलमधील एक पवित्र शब्द लिहिण्यास सांगितले. 

हेही वाचा -  लाखनीत झाला शिक्षिकेच्या अपहरणाचा प्रयत्न; आरोपी व्हॅनटालकास अटक

रविना आणि भारती यांनी त्या शब्दाची इंग्रजीत स्पेलिंग लिहले. फराह खान हिने स्पेलिंग तपासले. रविनाने स्पेलिंग बरोबर लिहिले होते. त्यावर फराहनने रविनाला दहा गुण दिले. भारतीने स्पेलिंग चुकीची लिहिले. त्यावर फरहाने भारतीला स्पेलिंग चुकल्याचे सांगून "भारती तू शब्दाची स्पेलिंग चूक लिहिले परंतु, त्याचा अर्थ तुला समजतो काय?' असा प्रश्‍न केला. त्यावर भारतीने "तो' शब्द एक शिवी आहे. लग्नानंतर नवीन जोडपे या शब्दाचा उच्चार करतात' असे उत्तर दिले. 

त्यावर फराहने भारतीला "तू स्पेलिंग चूक लिहिली परंतु, अर्थ बरोबर सांगितला' असे म्हटले. या उत्तरावर फराहने भारतीला पाच गुण दिले. या उत्तरावर रविना, फराह आणि भारती यांनी जोरात टाळ्या वाजवल्या व जोरजोरात हसल्या. त्यानंतर फराहने हा शब्द बायबलमधून घेण्यात आला असून, त्याचा अर्थ "प्रेस द लॉर्ड' असा सांगितला. मात्र, त्याचे हिंदूत भाषांतर करताना विनोद केला. त्यावर तिघीही जोरजोरात हसल्या. यामुळे ख्रिश्‍चन धर्माच्या भावना दुखावल्या गेल्या. 

चौकशीअंती गुन्हा

नागपूर शहर (जिल्हा) कॉंग्रेस कमिटी अल्पसंख्याक पश्‍चिम विभागाच्या अध्यक्ष खुशबू परवार (27, रा. गोरेवाड) यांनी परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त विवेक मासाळ यांच्याकडे तक्रार केली. पोलिसांनी याप्रकरणी चौकशी करून अखेर मानकापूर पोलिसांनी रविना टंडन, फराहखान आणि भारती सिंग यांच्यावर 295(अ), 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: filed a case against Actress Raveena Tandon, Farah Khan