लोकप्रिय तुकाराम मुंढेंविरोधात नागपूरच्या या पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जून 2020

कोरोनासारख्या भयंकर महामारीचा प्रादुर्भाव वाढेल अशी सरकारविरोधी कृती करून एका सनदी अधिकाऱ्याने सरकारच्या मार्गदर्शक तत्वाची अवहेलना केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अशी सरकारविरोधी कृती करून आयुक्‍त मुंढे यांनी नागरिकांचा जीव धोक्‍यात घालून चुकीचा संदेश पसरविला आहे.

नागपूर : आपल्याला आणि दुसऱ्याला कोरोनापासून वाचायचे असेल तर सोशल डिस्टनसिंग पाळण्याचे आवाहन नागपूर महापालिकेचे आयुक्‍त तुकाराम मुंढे वारंवार करीत राहतात. यासाठी त्यांनी अनेकदा कठोर निर्णय देखील घेतले. यामुळे त्याच्यावर अनेकांनी रोषही व्यक्‍त केला. मात्र, त्यांनीच सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचे उल्लंघन केले. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी गणेशपेठ पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. 

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनपा आयुक्‍त तुकाराम मुंढे हे 31 मे 2020 रोजी गणेशपेठ परिसरातील रजवाडा पॅलेसमधील सभागृहात आयोजित दोनशे लोकांच्या कार्यक्रमात मंचावरून नागरिकांना संबोधित करताना सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसत आहेत. या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य सरकारने पारित केलेल्या नियमांचे कोणत्याही प्रकारे पालन करताना ते दिसत नसल्याचे मनीष प्रदीप मेश्राम (रा. सिरसपेठ, नागपूर) तक्रार अर्जात म्हटले आहे. त्यांनी तक्रारीसोबत व्हिडिओचा संदर्भही जोडला आहे.

जाणून घ्या -  तर अशा घरांमधून बाहेर काढण्यात येईल; तुकाराम मुंढेचा इशारा 

कोरोना महामारीच्या काळात भारत सरकारने अद्याप कोणत्याही स्वरूपाच्या शासकीय, धार्मिक, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी दिलेली नाही. त्यामुळे आयुक्‍त मुंढे यांनी सार्वजनिक स्वरूपात कार्यक्रम आयोजित करून शासकीय नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप मेश्राम यांनी तक्रारीत केला आहे. आयुक्‍त मुंढे यांनी सार्वजनिक स्वरूपाचा कार्यक्रम आयोजित करून जवळपास दोनशे लोकांच्याही जीवितास धोका निर्माण केला आहे. 

कोरोनासारख्या भयंकर महामारीचा प्रादुर्भाव वाढेल अशी सरकारविरोधी कृती करून एका सनदी अधिकाऱ्याने सरकारच्या मार्गदर्शक तत्वाची अवहेलना केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अशी सरकारविरोधी कृती करून आयुक्‍त मुंढे यांनी नागरिकांचा जीव धोक्‍यात घालून चुकीचा संदेश पसरविला आहे. ज्या अधिकाऱ्यावर शहरातील आरोग्य व्यवस्था टिकवून ठेवण्याचे जबाबदारी आहे. नागरिकांची कोरोनासारख्या महामारीपासून संरक्षण करण्याची जबाबदारी आहे. असा अधिकारी शासकीय नियमांचे उल्लंघन करीत असेल तर तो गंभीर स्वरूपाचा गुन्हा ठरतो. त्यामुळे आयुक्‍त मुंढे यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी मेश्राम यांनी तक्रारीतून केली आहे.

क्लिक करा - मुलींच्या वसतिगृहांच्या इमारतीत चालतयं तरी काय?

तक्रार अर्ज वरिष्ठांकडे

मनीष मेश्राम यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तक्रार अर्ज स्वीकारला आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी तक्रार अर्ज सहायक पोलिस आयुक्‍तांकडे सोपविण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकारी तक्रारीवर चौकशी करीत आहे, अशी माहिती गणेशपेठ पोलिसांनी दिली. 

तुकाराम मुंढेवर कारवाई होणार?

कोणत्याही दबावात काम करू नका व शासकीय नियमांचे उल्लंघन करू नका, असे तुकाराम मुंढे मनपा अधिकाऱ्यांना वारंवार सांगत असतात. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना ते सोडत नाही. हे आजवरच्या त्यांच्या कार्यकाळातून दिसून येते. कडक आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार का? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Filed a complaint against Tukaram Mundhe at the police station