आणखी बावीस बोगस खेळाडूंविरुद्ध लवकरच गुन्हा !

crime
crime

नागपूर : सध्या गाजत असलेल्या बनावट प्रमाणपत्र प्रकरणी आणखी २२ बोगस खेळाडूंविरुद्ध लवकरच गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. या सर्व खेळाडूंचे प्रमाणपत्र बनावट आढळून आले असून, शासनाने ते रद्द ठरविले आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई होऊ शकते.

प्रभारी उपसंचालक अविनाश पुंड यांनी 'सकाळ'ला दिलेल्या माहितीनुसार, या खेळाडूंवर बनावट क्रीडा प्रमाणपत्र मिळवून शासकीय नोकऱ्या लाटल्याचा किंवा तसा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या खेळाडूंना शासनातर्फे नुकतेच लेखी पत्र देऊन मूळ कागदपत्रांची मागणी करण्यात आली होती. मात्र आतापर्यंत कुणीही ते सादर केले नाही. त्यामुळे अखेर या सर्वांचे प्रमाणपत्र रद्द करून त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचे आदेश पुणे येथील क्रीडा व युवक सेवा संचालनालय कार्यालयाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी दिले आहेत. त्यामुळे लवकरच या सर्वांविरुद्ध मानकापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार आहे.

या खेळाडूंनी पाच टक्के आरक्षणात नोकरी मिळविण्यासाठी ट्रॅंपोलिन व टंबलिंग या क्रीडा प्रकारातील बनावट प्रमाणपत्र मिळविल्याची माहिती आहे. यातील बहुतांश खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेले नाहीत किंवा त्यांची स्वाक्षरी बनावट असल्याचे उघडकीस आले आहे.

बनावट प्रमाणपत्र प्रकरणी आतापर्यंत चार बोगस खेळाडूंविरुद्ध पोलिसात तक्रार करण्यात आली असून, रवींद्र आबासाहेब सावंत (रा. कामेरी, जि. सांगली) व त्याचा भाऊ संजय सावंत या दोघांना अटकही झाली आहे. रवींद्र सध्या पोलिस कोठडीत असून, संजय मध्यवर्ती कारागृहात आहे. दोघांनीही राज्य लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा पास केली आहे.

रवींद्र हा उपशिक्षणाधिकारी असून, संजयचीदेखील पोलिस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली होती. चौकशीत रवींद्रकडून महत्त्वाची माहिती गोळा करण्यात येत असल्याचे मानकापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक व तपास अधिकारी कृष्णा शिंदे यांनी सांगितले. चौकशीत आणखी काही बडे मासे अडकण्याची किंवा मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. उल्लेखनीय म्हणजे आतापर्यंत ट्रॅंपोलिन खेळात अडीचशेच्या वर बनावट प्रमाणपत्रधारक आढळून आले आहेत. इतरही खेळांमध्ये अशी फसवणूक करणारे बोगस खेळाडू असण्याची शक्यता असून, त्यांना हुडकून काढण्याचा शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहे.

'सकाळ' ने उघडकीस आणला गैरप्रकार
राष्ट्रीय स्पर्धेत पदक जिंकल्याचे बनावट प्रमाणपत्र मिळवून राज्यातील अनेक खेळाडूंनी शासकीय नोकरी लाटल्याचे वृत्त 'सकाळ'ने सर्वप्रथम नऊ सप्टेंबरच्या अंकात प्रकाशित करून हा गैरप्रकार उघडकीस आणला होता. या प्रकरणी 'सकाळ'ने सातत्याने पाठपुरावा करीत राज्य शासनाला कारवाई करण्यास भाग पाडले. भविष्यात असे गैरप्रकार होऊ नये म्हणून शासनाने नुकतेच एक परिपत्रक काढून यापुढील सर्व राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये निरिक्षकांच्या नियुक्तीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यामुळे यापुढे स्पर्धांमध्ये पारदर्शीता येऊन, बनावट प्रमाणपत्र व बोगस खेळाडूंना आळा बसणार आहे.

सविस्तर वाचा - वाढदिवसाच्या पार्टीत मित्रावर हल्ला; नाचताना धक्का लागल्याचे कारण

हे बोगस खेळाडू आहेत रडारवर
क्रीडा आयुक्तांनी बनावट प्रमाणपत्र मिळविणाऱ्या ज्या २२ बोगस खेळाडूंविरुद्ध फौजदारी कारवाईचे आदेश दिले, त्यात दिनेश कदम (नागपूर), श्रीकृष्ण फुलझळके (नागपूर), जलपत वसावे (नागपूर), राहुलसिंग सावंत (नागपूर), जगजीत शेळके (नागपूर), संदीप मस्के (नागपूर), योगेश लेंगरे (नागपूर), रवी सुलाने (वर्धा), कैलास उकिरडे (नागपूर), नीलेश लक्कस (वर्धा), स्वप्नील राठोड (नागपूर), सचिन लेंडवे (नागपूर), गणेशकुमार चव्हाण (नागपूर), अनिता कंठाळे (वर्धा), योगेश काळे (नागपूर), अक्षय शिसोदे (नागपूर), सचिन कवलस (नागपूर), ज्ञानेश्वर गरुड (नागपूर), विशाल मावळ (नागपूर), मोहनसिंग शिसोदिया (नागपूर), विनोद आसबे (नागपूर), आकाश चंदवाडे (नागपूर) यांचा समावेश आहे.

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com