गृह उद्योगांवरही संकट, कोरोनाने बिघडले महिला बचत गटाचे आर्थिक गणित

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 मे 2020

उन्हाळ्यात अनेक टिकाऊ पदार्थ बनवून ठेवण्याची चढाओढ लागलेली असते. अनेक गृहिणी वेळ काढून पदार्थ बनवून आपल्यातील कला दाखवत असतात, तर काही महिला आपल्या घरी हे पदार्थ मोठ्या प्रमाणात तयार करून विकतात. यातून त्यांना चांगला नफा होत असल्याने दोन पैसे शिल्लक राहतात. काही महिलांची या व्यवसायावर गुजराण होते.

नागपूर  :  उन्हाळा म्हटले की पापड, कुरड्या, सांडगी याचा धंदा तेजीत असतो. उन्हाळ्यात तयार करण्यात येणा-या खाद्य पदार्थांवर बहुतेक महिला बचत गटांचे आर्थिक गणित अवलंबून असते. परंतु यंदा कोरोना महामारीचे संकट ओढवले असून त्याचा फटका महिला बचत गटांनाही बसला आहे. कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊनमुळे यंदाचा हंगाम वाया गेल्याने गृहउद्योगांवर अवलंबून असणा-या महिला आणि बचतगटांना फार मोठा फटका बसला आहे.

उन्हाळ्यात अनेक टिकाऊ पदार्थ बनवून ठेवण्याची चढाओढ लागलेली असते. अनेक गृहिणी वेळ काढून पदार्थ बनवून आपल्यातील कला दाखवत असतात, तर काही महिला आपल्या घरी हे पदार्थ मोठ्या प्रमाणात तयार करून विकतात. यातून त्यांना चांगला नफा होत असल्याने दोन पैसे शिल्लक राहतात. काही महिलांची या व्यवसायावर गुजराण होते.परंतु ऐन मार्च, एप्रिल आणि आता मे महिन्यातही कोरोनाचा धोका वाढला आणि सर्व व्यवसायांची गणिते बिघडली.

कच्चा माल दामदुपटीने विकत मिळत असल्याने महिलांनी ते खरेदी करणे बंद केले. तसेच अधिक किमतीने माल खरेदी केला तरी संचारबंदीमुळे गृहउद्योगांतर्गत केलेले पदार्थ खरेदी कोण करणार अशी भीती व्यक्त होऊ लागल्याने महिलांनी सर्व बेतच रद्द केले. दरम्यान  नोकरीच्या निमित्ताने बाहेर पडणाऱ्या, विविध क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक महिला गृहउद्योग करणाऱ्या महिलांना वर्षभर लागणाऱ्या पापड, कुरुड्या, वड्या इत्यादी वस्तू तयार करून मागत असत.  यंदा कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे या नोकरी करणाऱ्या महिलाही घरच्या वाळवण कामात म्हणजेच पापड, कुरुड्या तयार करण्यात रंगल्या आहेत, असे चित्र पाहायला मिळत आहे.

अवश्य वाचा- बीपीएल कार्डधारक असलेल्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंनाच मदत, मग इतरांनी उपाशी मरायचे का? क्रीडा खात्याच्या पत्रकावर तीव्र नाराजी

अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या महिला सोडल्या तर अनेक महिला सध्या घरी आहेत. लॉकडाऊनमुळे कुठे येण्या-जाण्यासाठी संधीही नाही. त्यामुळे महिला सध्या सकारात्मक दृष्टिकोनातून या वाळवणाच्या कामांकडे पाहात आहेत.

आर्थिक मदत होते

आम्ही दर वर्षी पापड, लोणची, शेवया बनवून विकतो. नोकरदार महिला देखील चांगले खाद्यपदार्थ म्हणून त्यांना पसंती देतात.  पण यावर्षी कोरोनामुळे मोठे नुकसान झाले आहे.  यातून मिळालेल्या पैशांतून मुलांच्या शाळेच्या खर्चासह अन्य गोष्टी पूर्ण करण्यास आर्थिक मदत होते.     
कांता गोतमारे, बोरगाव, नागपूर 

विचारणाही नाही
आमच्याकडे मार्च महिन्यातच वड्या, पापड, लोणची यांची मागणी होत असते. त्यानुसार माल आणून आम्ही सामान तयार करून देतो परंतु या वर्षी एकही आँर्डर मिळाली नाही कुणी साधी विचारणाही केली नाही त्यामुळे वस्तू तयार करून कुणाला विकणार, शिवाय शेवया, पापड,किंवा अन्य पदार्थ बनविले असते तर माल महाग असल्याने ते परवडले नसते.                  

सुनीता महल्ले, गोधनी, नागपूर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Financial crisis for cottage industry