बीपीएल कार्डधारक असलेल्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंनाच मदत, मग इतरांनी उपाशी मरायचे का? क्रीडा खात्याच्या पत्रकावर तीव्र नाराजी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर : ऑलिम्पिक क्रीडा प्रकार असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या नागपूर जिल्ह्यातील दारिद्य्ररेषेखालील गरीब खेळाडूंना आर्थिक साहाय्य देण्याचा क्रीडा खात्याचा निर्णय चुकीचा असून, या जाचक अटींमुळे बहुसंख्य खेळाडू मदतीपासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे या दोन्हीही अटी शिथिल कराव्यात, अशी मागणी शहरातील खेळाडू व प्रशिक्षकांनी शासनाकडे केली आहे.


कोरोना व लॉकडाउनमुळे अडचणीत सापडलेल्या खेळाडूंचे प्रश्‍न "सकाळ'ने समाजापुढे मांडले. या वृत्त मालिकेची दखल घेत क्रीडामंत्री सुनील केदार यांनी अशा खेळाडूंची यादी तयारी करावी अशी सूचना केली होती. त्यानंतर जिल्हा क्रीडाधिकारी अविनाश पुंड यांनी नुकतेच पत्रक काढून लॉकडाउनमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या ऑलिम्पिक क्रीडा प्रकारांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बीपीएल रेशन कार्डधारक खेळाडूंनाच साहाय्य देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. या अटींवर अनेक खेळाडू व प्रशिक्षकांनी तीव्र आक्षेप घेतला. त्यांच्या मते, शासनाने लादलेल्या अटी चुकीच्या आहेत. या अटींमुळे देशाचे प्रतिनिधित्व करणारे तसेच राष्ट्रीय पदकविजेते बहुतांश खेळाडू मदतीपासून वंचित राहणार आहेत. सकाळने व्यथा मांडल्यानंतर काही खेळाडूंना भरघोस मदत झाली. या आदेशामुळे पुन्हा या मोजक्‍याच खेळाडूंना मदत होणार आहे.

आंतरराष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत भारताला ब्रॉंझपदक मिळवून देणारा संदीप गवई म्हणाला, शासनाने मदत देताना बीपीएल कार्डची जी अट घातली ती मुळात चुकीची आहे. बहुसंख्य खेळाडू आर्थिकदृष्ट्या कमकुवत असले तरी, त्यांच्याकडे बीपीएल कार्ड नाही. अनेकांचे लग्न झालेले नाही. त्यामुळे आईवडिलांच्या रेशन कार्डमध्येच त्यांची नावे समाविष्ट आहेत. शासनाला खरोखरच खेळाडूंना आर्थिक मदत करायची असेल तर, ही अट काढणे आवश्‍यक आहे. अनेकांनी या अटींविरोधात तीव्र नाराजी व्यक्‍त केल्याचे ते म्हणाले. खो-खो प्रशिक्षक पराग बन्सोले यांनीही ऑलिम्पिक क्रीडा प्रकाराची अट काढण्याची मागणी केली. ते म्हणाले, भारतीय ऑलिम्पिक संघटनेची मान्यता असलेल्या कबड्डी व खो-खोसारख्या खेळांमध्ये अनेकांनी देशाचे प्रतिनिधित्व केले. भारताला पदके मिळवून दिलीत. त्यामुळे या खेळाडूंचे योगदान विसरता येणार नाही. दुर्दैवाने ऑलिम्पिक क्रीडा प्रकारांच्या अटीत बसत नसल्याने त्यांच्यावर अन्याय होऊ शकतो. शिवछत्रपती पुरस्कार विजेते पीयूष आंबुलकर यांनीही याविषयी नाराजी व्यक्त केली.

आर्थिक मदतीसाठी संबंधित खेळाडूंना स्पर्धा प्रमाणपत्र, बायोडाटा, दारिद्य्ररेषेखालील असल्याचे कागदपत्रे (बीपीएल रेशन कार्ड) पीडीएफ स्वरूपात जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयात येत्या 27 मेपर्यंत मेलद्वारे पाठविण्याचे आवाहन जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांनी केले आहे. खेळाडूंना ही सर्व कागदपत्रे dsongp30@gmail.com या ई-मेलवर अपलोड करायची असून, अपलोड केल्याचा एसएमएस जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांना पाठवायचा आहे. खेळाडूंची माहिती जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयामार्फत पुणे येथील क्रीडा व युवक संचालनालयाच्या आयुक्‍तांकडे पाठविण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी खेळाडूंनी 9890110300 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

दिव्यांग अभिषेकला दहा हजारांची मदत
देशातील पहिला "टीथ आर्चर' म्हणून ओळखला जाणारा नागपूरचा दिव्यांग तिरंदाज अभिषेक ठवरेसाठीही मदतीचा हात पुढे आला आहे. दोंडाईचा (जि. धुळे) येथील हस्ती पब्लिक स्कूलचे संचालक कैलास जैन यांनी अभिषेकला दहा हजार रुपये दिले. त्यांनी आपल्या बॅंक खात्यात पैसे टाकल्याचे अभिषेकने सांगितले. "सकाळ'ने अभिषेकवर नुकतेच वृत्त प्रकाशित केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com