विमानतळ परिसरातील धोकादायक इमारतींवर चालणार बुलडोझर, सर्वेक्षण पुन्हा सुरू

योगेश बरवड
Monday, 28 September 2020

विमानतळालगत असणाऱ्या सोनेगाव, शिवणगाव, जयताळा आदी भागांमध्ये उंचच उंच इमारती उभारण्यात आल्या आहेत. या इमारती विमानचे टेक ऑफ किंवा लँडिंगप्रसंगी धोकादायक ठरू शकतात. संभाव्य धोका लक्षात घेत डीजीसीएने आक्षेप घेत उपाययोजनेच्या सूचना केल्या.

नागपूर : डॉ. बाबासहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळालगतच्या धोकादायक इमारतींचा पुन्हा नव्याने शोध घेतला जाणार आहे. यापूर्वी विमनतळ प्राधिकरणतर्फे सर्वेक्षण करण्यात आले. आता विमानतळ संचालनाची जबाबदारी असणाऱ्या मिहान इंडिया लिमिटेड कंपनीकडून लगत असणाऱ्या उंच धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण केले जाणार आहे. सर्वेक्षणासाठी मिहान इंडियाने निविदाही प्रसिद्ध केल्याची माहिती पुढे आली आहे.

विमानतळालगत असणाऱ्या सोनेगाव, शिवणगाव, जयताळा आदी भागांमध्ये उंचच उंच इमारती उभारण्यात आल्या आहेत. या इमारती विमानचे टेक ऑफ किंवा लँडिंगप्रसंगी धोकादायक ठरू शकतात. संभाव्य धोका लक्षात घेत डीजीसीएने आक्षेप घेत उपाययोजनेच्या सूचना केल्या. त्यानुसार विमानतळ प्रशासनाने सर्वेक्षण करीत धोकादायक इमारती शोधल्या. महापालिकेमार्फत या इमारतींना नोटीसही बजावण्यात आल्या. 

हेही वाचा - भरचौकात हत्या झालेल्या गुंडाच्या अंत्यसंस्काराला उसळली हजारोंची गर्दी; नागपुरात गॅंगवॉर भडकण्याची शक्यता

पण, पुढील प्रक्रिया थंडबस्त्यात गेली. अलीकडेच मिहान इंडिया लिमिटेड (एमआयएल) आणि मनपा प्रशासनची संयुक्त बैठक पार पडली. यात विमानतळालगतच्या २९ इमारती धोकादायक असल्याची बाब समोर आली. याच बैठकीत भारतीय विमानतळ प्राधिकरणाला संबंधित अधिकार असल्याने त्यांच्यामार्फतच आणखी सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले होते. आता मात्र सर्वेक्षण एमआयएलकडून केले जाणार आहे. त्यासाठी एमआयएलने नुकत्याच निविदाही मागविल्या आहेत. त्यानुसार, एजन्सीला विमानतळ संकुलाच्या आजूबाजूच्या इमारती व इतर संरचनांचा अहवाल द्यावा लागेल. 

परिसरात मागील सात वर्षात बांधलेल्या सर्व इमारती व इतर बांधकामांची माहिती संकलित करावी लागेल. त्यात धावपट्टीपासून अंतर, उंची, भौगोलिक स्थान यासह नवीन इमारतींचे बांधकाम संग्रहित करावे लागेल. एजन्सीची नियुक्ती एका वर्षासाठी असेल. विमानतळ परिसरात नागरी वसाहतींचा झपाट्याने विकास सुरू आहे. पूर्वी वेगळ्या वाटणाऱ्या या वसाहती आता शहराचाच भाग झाल्या आहेत. निवासी इमारतीच काय व्यावसायिक इमारतीही मोठ्या प्रमाणात उभारल्या गेल्या आहेत. विमानतळापासून ठराविक अंतरापर्यंत इमारतींचे बांधकाम करताना विमानतळ प्राधिकरणाची परवानगी घेणे क्रमप्राप्त आहे. मात्र त्याकडे कानाडोळा केला जात असल्याचे दिसून येते. 

संपादन  : अतुल मांगे  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Find dangerous buildings in Nagpur airport area