Video : दुर्दैवी घटना : कापसाच्या जिनिंगला लागलेली आग, विझविताना झाला मजुराचा कोळसा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

लॉकडाउन काळात कापसाची खरेदी होत नसल्यामुळे शेतक-यांनी आंदोलने केलीत. थोडयाच दिवसात शासकीय कापूस खरेदीसाठी जिनिंगला परवानगी मिळाली. घोगरा येथील केंद्रावर दरदिवशी सुमारे पस्तिस गाडया मोजण्यात येत होत्या. अचानक गुरूवारी शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्यामुळे कोटयवधीच्या कापसासोबत तिथे कामावर असलेल्या एका मजूराचाही दुर्दैवी मृत्यू झाला.

जलालखेडा/मेंढला(जि.नागपूर): नरखेड तालुक्‍यातील घोगरा येथील दान कोटेड इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कापूस जिनिंगला गुरुवारी (ता. 28) अचानक भीषण आग लागली. ही आग शॉर्टसर्किट झाल्यामुळे लागल्याचे सांगण्यात येते. या आगीत एका कामगाराचा होरपळून मृत्यू झाला.

हेही वाचा : मनमुराद थुंका आता, रेल्वेने केली ही सुविाधा

12 कोटींचे नुकसान
गुरुवारी शेतकऱ्यांच्या कापसाच्या गाड्या तिथे मोजणीसाठी आल्या असता, अचानक दुपारी साडेतीनच्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन भीषण आग लागली. तिथे काम करणाऱ्या सर्व मजुरांनी आग दिसताच पळापळ केली. परंतु, किसना दत्तूजी गोरे (वय 38, लोहारा) यांचा बाहेर पडत असताना आगीत सापडून कापसाच्या ढिगात अडकून जागीच मृत्यू झाला. या आगीमध्ये अंदाजे बारा हजार क्‍विंटल कापूस राख झाल्याची माहिती आहे.

कापसाच्या सुमारे 1,000 ते 1,500 गाठीसुद्धा खाक झाल्या असून, एक ट्रॅक्‍टर व मशीन पूर्णपणे आगीत भस्मसात झाली. या आगीत सुमारे 10 ते 12 कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या वेळेवर पोहोचल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. घटनास्थळी जलालखेडा येथील ठाणेदार दीपक देकाटे, तहसीलदार हरीश गाडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बबन लोहे, पंचायत समिती सभापती नीलिमा रेवतकर आदी उपस्थित होते. आता येथे कापूस खरेदी रखडण्याची शक्‍यता आहे.

हेही नक्‍की वाचा : रक्‍ताने माखलेल्या मृतदेहाने पारडीत खळबळ

किसनाचा प्रयत्न अयशस्वी
आगीत जळून ठार झालेला कामगार किसना दत्तूजी गोरे हा अत्यंत विश्वासू होता. मालकाचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी स्वतःच्या जिवाची चिंता न करता आगीवर नियंत्रणाचा प्रयत्न केला व यातच त्यांचा होरपळून मृत्यू झाला. तो अविवाहित होता. त्याच्या अशा मृत्यूने त्याचे आई, वडील, बहीण, भाऊ यांचा आधारच गेला आहे. त्याच्या कुटुंबाला मदतीची मागणी करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The fire at the cotton ginning was extinguished by coal