नागभूमीत यावर्षी साजरी झाली होती पहिली बुद्ध जयंती 

file photo
file photo

नागपूर :  विज्ञानावर आधारलेला 'बुद्ध' डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1956च्या नागभूमीतील धम्मक्रांतीतून जगासमोर आणला. तर, दिल्ली येथे सार्वजनिक बुद्धजयंतीचा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली 2 मे 1950 रोजी झाला होता. हाच आदर्श ठेवत दीक्षाभूमीवरील धम्मदीक्षा सोहळ्याचे सूत्रधार धम्मसेनानी वामनराव गोडबोले यांनी 6 मे 1955 रोजी नागपुरात तीन दिवसांचा बुद्ध जयंतीचा कार्यक्रम घेतला होता. 

भारतात पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती दिल्ली येथे साजरी झाली. याच जयंती सोहळ्याच्या प्रेरणेतून वामनराव गोडबोले यांनी बुद्ध जयंतीची सुरुवात झाली. इंडियन बुद्धिस्ट कौन्सिल, शांतिवन चिचोली संस्थापक गोडबोले व त्यांचे इतर सहकार्यांनी नागपुरात प्रथमच बुद्ध जयंती साजरी केली. गोडबोले यावेळी म्हणाले होते की, भगवान गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञान व महापरिनिर्वाण असा त्रिवार मंगलमय दिवस म्हणजेच वैशाख पौर्णिमा हा होय. 6 मे 1955 ला वैशाख पौर्णिमेला बुद्धांच्या महापरिनिर्वाणाला 2499 वर्षे पूर्ण झाली होती. हे औचित्य साधत धम्मसेनापती गोडबोले यांनी वैशाख पौर्णिमेचा तीन दिवसांचा कार्यकम जाहीर केला होता.

भन्ते संघरक्षित यांच्या हस्ते बुद्धदूत सोसायटीची निर्मिती केली होती. याच सोसायटीच्या शाखेअंतर्गत बुद्ध जयंती साजरी व्हावी, यासाठी नामांकित बौद्ध भिक्‍खू एस. सागर नागपूरला आले होते. त्यावेळी बुद्ध जयंतीच्या कार्यकमाच्या रूपरेषेची माहिती देणारे एक पत्रक प्रकाशित केले होते. 6 मे 1955 ला भन्ते एस. सागर यांच्या उपस्थितीत बुद्धदूत सोसायटीच्या कार्यालयात त्रिशरण आणि सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात आली होती. भन्ते सागर यांचे बौद्ध धम्मावरील उपदेशावर प्रवचन झाले. यापूर्वी आनंदनगरातील लक्ष्मण झगूजी कवाडे यांनी भिक्‍खू एस. सागर यांच्याकडून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. अशा प्रकारे लक्ष्मण झगूजी कवाडे हे खऱ्या अर्थाने नागपूरचे पहिले धर्मांतरित बौद्ध होते. त्यानंतर बुद्धदूत सोसायटीचे सभासद मनोहर शहाणे यांनीदेखील भन्ते एस. सागर यांच्याकडून बौद्ध धम्माची दीक्षा प्रदान केली.

7 मे 1955 ला सायंकाळी 6 वाजता इंदोरा येथील बाळकृष्ण मोहल्ल्यात गोंडाणे भवनात बुद्धदूत सोसायटीच्या इंदोरा शाखेचे उद्‌घाटन झाल्यानंतर कंबोडियातील भन्ते के. के. स्थितप्रज्ञ यांनी बौद्ध धम्मावर प्रवचन दिले होते. 8 मे 1955 या दिवशी निघालेल्या मिरवणुकीत हत्तीवर तथागत भगवान गौतम बुद्धांचा प्रतिमा होती. तसेच हत्तीसमोर बॅण्ड, मागे रणगाडे, भजन मंडळी आणि जनसमुदाय उपस्थित होता. सहभागी झालेल्या महिला-पुरुषांच्या हातात पेटत्या मेणबत्त्या होत्या. सारे उपासक साधू-साधू-साधूचा जयघोष करत जात होते. 

या मिरवणुकीत 'अनुसरा हो, बुद्धा : धम्म आणि संघ...' ही धून वाजवण्यात आली होती. ही मिरवणूक आनंद टॉकीजमागील कोठारी मेंशन भवनमधील बुद्धदूत सोसायटीच्या कार्यालयातून काढण्यात आली होती. पुढे श्री टॉकीज, आनंद भंडार, सीताबर्डी चौक, गांधी पूल, संत्रा मार्केट, मेयो हॉस्पिटल, इतवारी चौकातून, महाल चौक, शुक्रवार दरवाजा, नवी शुक्रवारी, उंट खाना मार्गाने रात्री 8 वाजता इमामवाड्यात विसर्जित करण्यात आली होती. 

-शेखर गोडबोले, नागपूर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com