तुकाराम मुंढेंनी करून दाखवलं, 45 दिवसांत नागरिकांसाठी केली ही आवश्‍यक सुविधा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जून 2020

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात अवघ्या 45 दिवसांत आरोग्य सेवेचा कायापलट झाला. जनतेसाठी 450 खाटा असलेली पाच रुग्णालय अत्याधुनिक आरोग्य सुविधासह उपलब्ध होणार आहे.

नागपूर : महापालिकेची आतापर्यंत दुर्लक्षित असलेली रुग्णालये आता केवळ चकाचकच होत नाही तर सुविधांनीही परिपूर्ण होत आहे. महापालिकेने दोन नवीन रुग्णालये तयार केली असून, तीन रुग्णालयामध्ये क्षमता वाढ केली. त्यामुळे आता 450 खाटांची पाच रुग्णालये नागपूरकरांच्या सेवेत उपलब्ध होणार आहे. 

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात अवघ्या 45 दिवसांत आरोग्य सेवेचा कायापलट झाला. जनतेसाठी 450 खाटा असलेली पाच रुग्णालय अत्याधुनिक आरोग्य सुविधासह उपलब्ध होणार आहे. यातील 300 खाटांचे रुग्णालय तयार असून उर्वरीत 150 खाटांचे रुग्णालय पुढच्या 7 दिवसात सज्ज होतील. इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगर, आयसोलेशन हॉस्पीटल इमामवाडा आणि पाचपावली स्त्री रुग्णालय खाजगी रुग्णालय आणि कार्पोरेट कार्यालयांना लाजवेल असे तयार करण्यात आले. 

अधिक माहितीसाठी - नागपूरच्या या 'लेडी डॉन'ने केली अनेक पोलिस अधिकाऱ्यांची "शिकार"
 

इंदिरा गांधी रुग्णालयाची क्षमता केवळ 30 खाटांची होती, आता ती 130 झाली. येथे आईसीयू आणि ऑक्‍सीजनचीही सुविधा आहे. तळमजल्यासह तीन माळयाचे हे रुग्णालय कित्येक वर्षापासून दुर्लक्षीत होते. 20 खाटांची क्षमता असलेले आयसोलेशन हॉस्पीटल आता 32 खाटांचे झाले असून ही क्षमता 60 पर्यंत करण्यात येणार आहे. पाचपावली सूतिकागृह आता पाचपावली स्त्री रुग्णालय झाले असून येथे 90 खाटा वाढविण्यात आल्याअसून आता 110 खाटा आहेत. 

केटीनगर हॉस्पीटल आणि आयुष हॉस्पीटल ही दोन नवीन रुग्णालये असून त्यांची क्षमता अनुक्रमे 120 आणि 30 खाटांची आहे. येथील प्रत्येक बेडला आक्‍सीजनची सोय आहे. इंदिरा गांधी रुग्णालय, पांचपावली स्त्री रुग्णालय आणि केटीनगर रुग्णालयात 50 खाटांचा अतिदक्षता विभाग आहे. या सर्व रुग्णालयामध्ये नवीन बेड्‌स असून टाइल्स, बाथरुम, टॉयलेटस, लिफ्ट आदीची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. 
 

अत्याधुनिक सुविधा 

येथील प्रत्येक बेडला आक्‍सीजनची सोय आहे. इंदिरा गांधी रुग्णालय, पांचपावली स्त्री रुग्णालय आणि केटीनगर रुग्णालयात 50 खाटांचा अतिदक्षता विभाग आहे. रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत मल्टीपॅरा कार्डियक मॉनिटर, इसीजी, सोनोग्राफी मशीन, एक्‍सरे मशीनची सुविधा राहणार आहे. इंदिरा गांधी रुग्णालय, पाचपावली स्त्री रुग्णालय आणि केटीनगर मध्ये अत्याधुनिक ऑपरेशन थिएटरची व्यवस्था आहे. 

 
मुख्यमंत्र्यांनी दिला निधी 

लॉकडाऊनमुळे मिळालेल्या संधीचा लाभ घेत मनपाने पाच रुग्णालयांचा कायापलट केला. या रुग्णालयांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'एसडीआरएफ'मधून निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली. याशिवाय डीपीसी आणि मनपा निधीही खर्च करण्यात आला आहे. यापूर्वी महापालिकेचे एवढी क्षमता असणारे रुग्णालय नव्हते. नागरिकांनी या आरोग्य सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five 450-bed hospitals of the Corporation in the service of Nagpurkars