जागतिक रक्तदाता दिन : आदर्श रक्तपेढीचा दर्जा लॉकडाउनच्या काळातही कायम, वाचा सविस्तर...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जून 2020

विशेष असे की, व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी फुटाळा तलावासमोर प्रेमीयुगुलांना रक्तदानाचे महत्त्व सांगण्याचा कार्यक्रम घेण्यात येतो. संविधान चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच महापरिनिर्वाणदिनी रक्तदान होते. 

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय-सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने आदर्श रक्तपेढीचा दर्जा लॉकडाउनच्या काळात कायम ठेवला आहे. गतवर्षी 12 महिन्यात 12 हजार 317 रक्तपिशव्या गोळ्या केल्या होत्या. मात्र, यावर्षी लॉकडाउनमुळे रक्तपिशव्या गोळा करणे एक आव्हान होते. परंतु, मेडिकलने ते पेलवत सहा महिन्यांत पाच हजारांपेक्षा अधिक रक्तपिशव्या गोळा करण्यात यश मिळवले आहे. 

मेडिकलमध्ये गरीब रुग्ण उपचारासाठी येतात. त्यांना रक्तदाता मिळणे कठीण असते. अशा वेळी रक्ताची गरज भागवण्यासाठी मेडिकल-सुपर स्पेशालिटीतील रक्तपेढीचा पुढाकार असतो. जनजागृती करणारी पोस्टर बनवून ते ऑनलाइन अपलोड करण्याची संधी देण्यापासून तर मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून रक्तदान मिळवून त्याचा गरीब रुग्णांसाठी उपयोग करणारी यंत्रणा मागील पाच वर्षांपासून मेडिकलमध्ये सुरू आहे. विशेष असे की, व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी फुटाळा तलावासमोर प्रेमीयुगुलांना रक्तदानाचे महत्त्व सांगण्याचा कार्यक्रम घेण्यात येतो. संविधान चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच महापरिनिर्वाणदिनी रक्तदान होते.

हेही वाचा - नागपूरच्या या 'लेडी डॉन'ने केली अनेक पोलिस अधिकाऱ्यांची "शिकार"

गतवर्षी असे झाले रक्तदान

ऐच्छिक रक्तदात्यांची संख्या वाढवण्यात पुढाकार घेतला जातो. राज्यात 2018-19 मध्ये रक्तसंकलन 16 लाख 56 हजार झाले. पुणे विभागात सर्वाधिक तीन लाख 82 हजार 611 रक्तपिशव्या गोळा झाल्या. यानंतर मुंबईत दोन लाख 98 हजार 385 रक्तयुनिट गोळा झाले. तर नागपुरात एक लाख 79 हजार रक्तपिशव्या संकलित झाल्या आहेत. रक्तसंकलनात नागपूर राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

रक्तदानाचा खरा सेवाधर्म पाळा 
पेशंटला रक्ताची गरज आहे, असे डॉक्‍टरांनी सांगितल्यावर पेशंटचे नातेवाईक चिंतेत पडतात. ऐनवेळी कुठे जावे, काय करावे, जास्त युनिट रक्त लागणार असेल तर त्यांच्या खर्चाची चिंताही असतेच. अशावेळी रक्तदानाचा खरा सेवाधर्म पाळला जावा. स्वेच्छेने रक्तदान केल्यास गरजूंना खर्च न करता रक्त मिळेल. हीच खरी लोकसेवा आहे. 
- डॉ. संजय पराते, 
विभागप्रमुख, विकृतिशास्त्र विभाग, सुपर स्पेशालिटी, नागपूर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five thousand bags of blood during the lockdown