कोण म्हणते कोरोना रुग्णांसाठी बेड नाही? नागपुरात तर पाच हजार बेड पडले आहेत धूळखात!

Five thousand beds are lying in the dust in Nagpur
Five thousand beds are lying in the dust in Nagpur

नागपूर : एकीकडे बेड नसल्याने बाधितांना दुसऱ्या शहरात हलविले जात असतानाच शहरापासून अवघ्या पाच किमी अंतरावर पाच हजार बेड धूळखात पडले आहेत. दोन महिन्यांपूर्वी महापौर दयाशंकर तिवारी यांनी येथे भेट दिली होती. दोन महिन्यांत कोरोनाने उग्ररूप धारण केले असताना या बेडचा वापर का केला जात नाही आणि महापौर व प्रशासनाला येथील बेडबाबत निर्णय घेण्यास आणखी किती कालावधी लागणार, असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कळमेश्वर रोडवर शहरापासून पाच किमी अंतरावरील राधास्वामी सत्संग न्यास या आश्रमाच्या परिसरात पाच हजार बेडचे कोविड सेंटर उभारले होते. एवढेच नव्हे विलगीकरणात येणाऱ्या नागरिकांसाठी येथे प्रसाधनगृहही तयार करण्यात आले होते. हे कोविड सेंटर सुसज्ज केले असते तर शहरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला असता. परंतु, वर्षभरापासून येथील पाच हजार बेड, गाद्या एकावर एक रचून त्याचे इमले तयार करण्यात आले आहे. वर्षभरापासून हे साहित्य धूळखात पडले आहे.

महापौर दयाशंकर तिवारी यांनी २ फेब्रुवारीला येथे भेट दिली होती. यावेळी त्यांच्यासमवेत नगरसेवक सुनील अग्रवाल, उपायुक्त मिलिंद मेश्राम यांच्यासह न्यासचे पदाधिकारी उपस्थित होते. संबंधित सर्व साहित्याबाबत मनपा आयुक्तांसोबत चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी न्यासच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले होते. परंतु, त्याबाबत कुठेही प्रयत्न झाले नसल्याने शहरातील रुग्णांना अमरावती येथे पाठविण्याची वेळ आली आहे.

पालकमंत्र्यांना जंबो कोविड रुग्णालयाचा विसर

पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मागील ऑगस्टमध्ये विभागीय कार्यालयात बैठक घेऊन मानकापूर क्रीडा संकुलात जंबो कोविड रुग्णालय उभारण्याची घोषणा केली होती. परंतु, आठ महिन्यांत या जम्बो कोविड रुग्णालयाची विटही रचता आली नाही. आज पालकमंत्री कोविड स्थितीवर अनेक बैठक घेत आहेत. परंतु, जंबो कोविड रुग्णालयाबाबत शब्दही काढत नसल्याने त्यांना विसर पडल्याचे चित्र आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com