ऑनलाईनमधील चीनची मक्‍तेदारी संपुष्टात आणण्यासाठी केले जाताहेत हे उपाय... 

Focus on Swadeshi through social media to dominate the online market
Focus on Swadeshi through social media to dominate the online market

नागपूर : देशात मोठ्या प्रमाणात असलेल्या सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या माध्यमातून चीनची मक्‍तेदारी असलेल्या ऑनलाईन बाजारावर ताबा मिळविण्यासाठी सोशल मीडियातून स्वदेशीवर भर दिला जात आहे. एकीकडे चीनची उत्पादने जाळतानाच सोशल मीडियावर भारतीय उत्पादने वापरण्यावर मोठी मोहीम सुरू आहे. या मोहिमेतून राष्ट्रवादाचा जपानी पॅटर्न वापरण्याच्या आवश्‍यतेवर भर दिला जात आहे. मात्र, यासाठी येथील किरकोळ व्यावसायिक, परंपरागत बारा बलुतेदारांना ऑनलाईन बाजारावर ताबा मिळविण्यासाठी प्रशिक्षित करण्याची गरज व्यक्त केली जात असून अशा प्रशिक्षणाची तयारी सुरू झाली आहे. 

एका सर्वेक्षणानुसार, देशात 65 टक्के तरुणाई असून यातील 40 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नागरिक पूर्णवेळ सोशल मीडियाचा वापर करीत आहेत. यात 65 टक्के तरुणाईचा समावेश आहे. याच तरुणाईत चीनला धडा शिकविण्याची आणि देशाला आर्थिक क्षेत्रात उच्च शिखर गाठून देण्याची क्षमता असल्याचे सोशल मिडिया विश्‍लेषक अजित पारसे यांनी नमुद केले. जगभरातून आयात होणारे उत्पादन, तंत्रज्ञानाला समांतर उत्पादने, तंत्रज्ञान उभे करण्याची क्षमता येथील उद्योजक व संशोधकांमध्ये आहे, त्याचप्रकारे ती उत्पादने खरेदी करून देशाला आर्थिक महासत्ता बनविण्याची ताकद या तरुणाईत आहे. 

सोशल मीडियात नावीन्यपूर्ण संकल्पनेचा वापर करून आतापर्यंत चीनने उत्पादने जगभरात पोहोचविली. आता सोशल मीडियातून चीनविरोधी मोहीम आणि स्वदेशीवर भर देण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. हैदराबाद येथील डॉ. रेड्डी हत्याकांडाने सोशल मीडियाची ताकद दाखवून दिली. सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या दबावामुळे डॉ. रेड्डी यांना पोलिसांनी कुठलेही विपरीत न घडू देता न्याय दिला. सोशल मीडियाची ही ताकद भारतीय उत्पादक, व्यावसायिक, किरकोळ व्यावसायिकांनी ओळखण्याची गरज पारसे यांनी व्यक्त केली. 

आता चीनने भारतीय सैन्यावर हल्ला केल्यानंतर राष्ट्रवादाची भावना पेटली आहे. हीच भावना स्वदेशी उद्योग आणि आत्मनिर्भर क्रांती घडवून आणण्याची शक्‍यता आहे. किरकोळ व्यावसायिक, बारा बलुतेदार, उद्योजकांना ऑनलाईन बाजारपेठेवर ताबा मिळविण्यासाठी हीच उत्तम वेळ आहे. दरवर्षी नवनवीन पुढे येणाऱ्या व्यावसायिक संकल्पनांना सोशल मीडियातून व्यावसायिकांनी पुढे आणल्या तर लघू, मध्यम, कुटीर उद्योग भरभराटीस येईल, असा विश्‍वास पारसे यांनी व्यक्त केला. 

ग्रामीण भागातील उत्पादने मॉलमध्ये विकली जातील, त्या दिवशी देश आर्थिक महासत्तेकडे पाऊल टाकेल. यासाठी जपानमधील औद्योगिक राष्ट्रवादाच्या पॅटर्नची गरज आहे. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर गेल्या 75 वर्षात जपानने स्वदेशीवर भर दिला. आज त्यांची उत्पादने जगात सर्वोच्च म्हणून गणली जात असून, त्यांना बाहेरून सुईही आयात करावी लागत नाही. त्यांनीही स्वदेशीवर भर देत सोशल मीडियाच्या माध्यमातून बाजारपेठ काबीज केली. देशालाही राष्ट्रवादाचा जपानी पॅटर्न राबविण्याची गरज आहे. चिनी वस्तूंची जाळपोळ करण्याऐवजी औद्योगिक राष्ट्रवाद दाखविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. 

 
विक्रेत्यांना प्रशिक्षित करणे गरजेचे 
यावर्षी 60 कोटी भारतीय पूर्णवेळ इंटरनेटचा वापर करीत होते, असे स्टॅटिस्टा.कॉम या संस्थेच्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले. यात ऑनलाईन खरेदी करणाऱ्यांचे मोठे प्रमाण आहे. भारतीयांची खर्च करण्याची क्षमता देशाला आर्थिक स्वातंत्र्य देऊ शकते. यासाठी सर्वप्रथम येथील किरकोळ विक्रेते, दुकानदार, बारा बलुतेदारांना ऑनलाईन विक्रीचे प्रशिक्षण देऊन एका व्यासपीठावर आणण्याची गरज आहे. 
- अजित पारसे, सोशल मिडिया विश्‍लेषक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com