बापरे काय हे... नागपूर विद्यापीठाच्या चाळीस टक्के जागा रिक्त

मंगेश गोमासे
Wednesday, 30 September 2020

विद्यापीठाच्या पदवी प्रवेशासाठी १७ जुलैपासून सुरुवात झाली. कोरोनामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले नसल्याची बाब समोर आल्याने विद्यापीठाने दोन दिवस म्हणजे ३० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली. १ लाख ८ हजार ४०६ विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर नोंदणी केली.

नागपूर ः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा आज अंतिम दिवस होता. विद्यापीठाच्या ऑनलाइन पदवी प्रवेश प्रक्रियेत यंदा केवळ ६० टक्केच प्रवेश नोंदविण्यात आले आहे. यापैकी ७० टक्के प्रवेश नामवंत महाविद्यालयांमध्ये झाले असून इतर महाविद्यालयांमध्ये केवळ तीस टक्के प्रवेश नोंदविण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे प्रवेशासाठी कुठल्याही प्रकारची मुदतवाढ देण्यास विद्यापीठाने नकार दिला आहे.

विद्यापीठाच्या पदवी प्रवेशासाठी १७ जुलैपासून सुरुवात झाली. कोरोनामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले नसल्याची बाब समोर आल्याने विद्यापीठाने दोन दिवस म्हणजे ३० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली. १ लाख ८ हजार ४०६ विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर नोंदणी केली.

सफाई कर्मचाऱ्यांच्या सोबतीने काम करणार गार्बेज पिकिंग मशीन

यापैकी ८२ हजार ६३० विद्यार्थ्यांनी माहिती सादर केली. यापैकी केवळ ६० टक्के विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश नोंदविले. इतर महाविद्यालयात अद्यापही ३० टक्केच विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असल्याची माहिती समोर आली. याबाबत महाविद्यालयांच्या प्राचार्यांना विचारणा केली असता, त्यांनी याला दुजोरा देत विद्यार्थी प्रवेशासाठी येतच नसल्याचे स्पष्ट केले. विशेष म्हणजे ३० सप्टेंबरपर्यंत प्रवेशाची मुभा होती. आज ती संपल्याने बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेले नाहीत.

मुदतवाढीची प्राचार्य फोरमची मागणी
अभियांत्रिकी सह व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू होताच नामवंत महाविद्यालयात टक्केवारीच्या भरवशावर प्रवेश मिळविणारे बरेच विद्यार्थी प्रवेश रद्द करून व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतील. त्यामुळे नामवंत महाविद्यालयातील जागा रिक्त होणार आहेत. मात्र विद्यापीठाची प्रवेशाची तारीख निघून गेल्याने या जागा रिक्तच राहतील. यामुळे महाविद्यालयांना आर्थिक फटका बसणार असून विद्यार्थ्यांनाही प्रवेशापासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे पदवी प्रवेशाला मुदतवाढ देण्याची मागणी प्राचार्य फोरमने केली आहे.

विद्यापीठामधील शाखानिहाय जागा
कला - ४०,०००
वाणिज्य - ३०,०००
विज्ञान - ३५,०००
विधी - १,५००
गृहविज्ञान - ४००
गृहअर्थशास्त्र - ५००

कुलगुरूच्या अधिकारात असलेली मुदतवाढ करण्यात आलेली आहे. आता पुन्हा मुदतवाढ देता येणे शक्य नाही. अभियांत्रिकी वा इतर व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेशासाठी प्रवेश मिळावे यासाठी सरकारकडून परवानगी घ्यावी लागेल.
-डॉ. सुभाष चौधरी, कुलगुरू


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Forty percent of Nagpur University seats are vacant