
फिरोज हा मूळचा नागपूरचा आहे. तो गेल्या काही वर्षांपासून झारखंडमध्ये राहत होता. त्याने नागपुरातील गांजा विक्रेत्यांना गांजा विक्रीसुरू केली होती. पप्पू सिंग नावाच्या गांजा विक्रेत्यासाठी त्याने खेप आणली होती, अशी माहिती आहे.
नागपूर : झारखंडमधील तस्करांनी उपराजधानीत तस्करी करून गांजा आणला. मात्र, गिट्टीखदान पोलिसांनी रविवारी संशयाच्या आधारावर दोघांना कारसह ताब्यात घेतले. कारमधून चार लाख २० हजारांचा गांजा जप्त केला असून, दोघांना अटक केली. फिरोज अन्सारी नूर मोहम्मद (काटाटोळी, रांची- झारखंड) आणि शुभम ऊर्फ ढग्या श्रीराम करकुले (२१, नागपूर) अशी अटकेतील गांजा तस्करांची नावे आहेत.
गिट्टीखदान पोलिस ठाण्याचे डीबी पथक गस्त करीत असताना त्यांना संशयास्पद कार दिसली. हजारीपहाड परिसरात त्या कारला पोलिसांनी अडविले. कारमधून उतरून दोन युवकांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून ताब्यात घेतले. कारची झडती घेतली.
कारमधून दोन पोत्यात २८ किलो गांजा जप्त करण्यात आला. गांजाची किंमत चार लाख २० हजार असून, पाच लाखांची कार पोलिसांनी जप्त केली. ही कारवाई डीसीपी विनीता साहू यांच्या मार्गदर्शनात पीआय सुनील चव्हाण, पीएसआय दत्ता पेंडकर, हवालदार राजेश दुबे, सूरज थोटे, यांनी केली.
नागपूर जिल्ह्यातील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा
फिरोज हा मूळचा नागपूरचा आहे. तो गेल्या काही वर्षांपासून झारखंडमध्ये राहत होता. त्याने नागपुरातील गांजा विक्रेत्यांना गांजा विक्रीसुरू केली होती. पप्पू सिंग नावाच्या गांजा विक्रेत्यासाठी त्याने खेप आणली होती, अशी माहिती आहे. कारसुद्धा चोरीची असल्याचा संशय असून, नागपूर पोलिस झारखंड पोलिसांशी संपर्क करीत आहेत. आरोपींना सात जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
संपादन - नीलेश डाखोरे