उपराजधानीत चार शिवभक्‍त ठरले शिवराज्याभिषेकाचे मानकरी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 जून 2020

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शिवतीर्थावर गर्दी करू नका असे आवाहन आयोजन समितीने केले होते. त्यामुळे अतिशय साध्या पध्दतीने कुठेही खंड न पडू देता यंदाचे आयोजन करण्यात आले. 

नागपूर : उपराजधानी नागपुरातील महाल गांधीगेट येथील शिवतीर्थावर ढोलताशाच्या गजरात दरवर्षी मोठ्या दिमाखात साजरा होणारा शिवराज्याभिषेक सोहळा यंदा साध्या पद्धतीने झाला. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शिवतीर्थावर गर्दी करू नका असे आवाहन आयोजन समितीने केले होते. त्यामुळे अतिशय साध्या पध्दतीने कुठेही खंड न पडू देता यंदाचे आयोजन करण्यात आले. 

दरवर्षी शिवराज्याभिषेक सोहळा समितीतर्फे असामान्य कामगिरी करणाऱ्यांना गौरविण्यात येते. फटाक्‍यांची आतषबाजी, तलवारबाजी, दंड प्रात्याक्षिके, मल्लखांबाचे प्रत्याक्षिके बघण्यासाठी येथे लाखो लोक एकत्रित येतात. असंख्य शिवभक्‍तांच्या उपस्थितीत होणारा हा सोहळा यंदा मात्र मोजक्‍याच लोकांमध्ये होईल असा निर्णय समितीने घेतला व त्याचे तंतोतंत पालनही केले. 

वाचासावधान! मास्क न वापरल्यास भारावा लागेल दंड 

कोरोनाच्या युद्धात लढणाऱ्या चार योद्‌ध्यांना शिवराज्यभिषेकाचा मान देण्याचा आदर्श निर्णय देखील यंदा शिवराज्याभिषेक समितीने घेतला. विशेष म्हणजे त्यांच्या या निर्णयाचे सर्वस्तरावरून स्वागतही झाले. याप्रसंगी सफाई कामगार पांडुरंगजी गडीकर, परिचारिका सुनीता सीताराम भोयर, पोलीस कर्मचारी अंकुश चौधरी, डॉ. रुद्रेश चक्रवर्ती यांच्याहस्ते छत्रपतींचे विधीवत पूजन करण्यात आले. राज्यभिषेकाच्यावेळी मोजकीच मंडळी उपस्थित होती. त्यानंतर या चौघांना समितीतर्फे गौरविण्यात आले. दरवर्षी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या असंख्य शिवभक्‍तांनी छत्रपतींचे ऑनलाईन दर्शन घेतले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: four lucky persons performed Shivrajyabhishek in nagpur