श्वास घेणं कठीण झालं, पण दाखविली मरणाची वाट; चार खासगी रुग्णालयात खेटे घातल्यानंतर मेडिकलमध्ये दाखल

four private hospital not admitted corona patients in nagpur
four private hospital not admitted corona patients in nagpur

नागपूर : साठीतील व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. श्वास घेणे कठीण झाले. ऑक्सिजन लावले होते. रुग्णवाहिकेतून बाहेर काढण्यासाठी त्यांना आधाराची गरज पडत होती. मात्र, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्किममधील (सीजीएचएस) कर्मचारी असलेल्या व्यक्तीला ४ खासगी रुग्णालयांतून परत पाठवले. एक खाट या केंद्रीय कर्मचाऱ्याला उपलब्ध करून दिली नाही. अनेक कोरोनाबाधित रुग्ण चार ते पाच तास अ‌ॅम्बुलन्समध्येच असतात. अखेर या बाधित रुग्णाला मेडिकलमध्ये दाखल करून घेण्यात आले. त्यावेळी या रुग्णाच्या पत्नीने हात जोडून डॉक्टरचे आभार मानले. 

जिल्ह्यात कोविड रुग्णांसाठी पाच हजार खाटा असल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतरही खासगी रुग्णालयांत रुग्णांना दाखल करून घेण्यात येत नाही. खासगी रुग्णालयांनी हाउसफुल्लचे बोर्ड लावले आहेत. अनेक रुग्णांना रुग्णवाहिकेचे बिल अदा करणे कठीण होत आहे. दुपारी २ वाजता मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमध्ये नंदनवन येथील रहिवासी असलेले ज्येष्ठ कोरोनाबाधित अ‌ॅम्बुलन्समधून पोहोचले. अ‌ॅम्बुलन्समध्ये असलेला ऑक्सिजन मास्क त्यांना लावण्यात आला होता. मुलगा, पत्नी सोबत होते. या ज्येष्ठ रुग्णाला प्रथम वोक्हार्ट हॉस्पिटल, सेव्हन स्टार आणि क्रिसेन्ट अशा चार रुग्णालयात नेले. मात्र, एकाही रुग्णालयात यांना दाखल करून घेण्यात आले नाही. निवृत्त केंद्रीय कर्मचारी असल्याने विमा योजनेतून खर्च होणार होता. यानंतरही खासगीत प्रवेश नाकारण्यात आला. अखेर मेडिकलमध्ये आणले. मेडिकलच्या कोविड रुग्णालयात रुग्णाच्या मुलाने डॉक्टरांशी संपर्क साधून दाखल करण्याची विनंती केली. 

ज्यांचे कोणी नाही त्यांचे मेडिकल - 
ज्येष्ठ कोरोनाबाधित रुग्णाला श्वास घेण्यास अडचण होती. मेडिकलचे कोविड रुग्णालयातील डॉ. कांचन वानखेडे यांना माहिती मिळताच त्यांनी वॉर्डात खाट उपलब्ध करून दिली. त्यांना ऑक्सिजन लावले. औषधोपचारही सुरू झाले. चार तास ते अ‌ॅम्बुलन्समध्येच होते. याशिवाय अमरावतीहून एक गंभीर संवर्गातील रुग्ण रुग्णवाहिकेतून पोहोचला होता. त्यांच्या नातेवाईकांनीही रुग्णवाहिकेतून नागपुरातील धंतोली परिसरातील तीन खासगी रुग्णालयांत दाखल करण्यासाठी प्रयत्न केले. अखेर मेडिकल गाठले. येथे तासभराच्या प्रतीक्षेनंतर कोविड वॉर्डात दाखल करण्यात आले. ज्यांचे कोणी नाही, त्यांचे मेडिकल आहे, असे म्हणण्याची वेळ आता आली आहे. 

मेडिकल साऱ्यांसाठी आहे. कोणालाही परत पाठवले जात नाही. प्रत्येकाला उपचार मिळावा यासाठी येथील डॉक्टर परिश्रम घेत आहेत. कोरोनाची लक्षणे दिसताच चाचणी करावी. नियमित उपचार घेतल्यास रुग्ण घरीच बरा होतो. येथील डॉक्टरांसह प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्यावर कामाचा ताण वाढला आहे. मात्र, मेडिकलमधील डॉक्टर सेवेसाठी तत्पर आहेत. 
- डॉ. सुधीर गुप्ता, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्याालय व रुग्णालय, नागपूर. 


 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com