पर्सनल आयडीचा उपयोग करून मिळवायचे ई तिकीट, अशी झाली कारवाई

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जून 2020

सध्या मोजक्‍याच रेल्वेगाड्या सुरू असून, नागरिकांना परतण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेता दलालांनी रेल्वे तिकीट काढून त्यांची दुप्पट-तिप्पट दराने विक्री करण्याचा व्यवसायच थाटला आहे.

नागपूर : देशाच्या विविध भागात अडकून पडलेल्या नागरिकांना स्वगृही परतता यावे यादृष्टीने लॉकडाउनचे नियम शिथील होताच रेल्वेने मोजक्‍या प्रवासी रेल्वेगाड्याही सुरू केल्या आहेत. ही संधी मानून रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणारे दलालही सक्रिय झाले आहेत. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने दलालाविरुद्ध कारवाईची धडक मोहीमच आरंभली आहे. त्याअंतर्गत 14 दलालांना अटक करण्यात आली. त्यातील 10 आरोपी आयआरसीटीसीचे अधिकृत एजंट्‌स आहेत. आहेत, हे विशेष.

सध्या मोजक्‍याच रेल्वेगाड्या सुरू असून, नागरिकांना परतण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेता दलालांनी रेल्वे तिकीट काढून त्यांची दुप्पट-तिप्पट दराने विक्री करण्याचा व्यवसायच थाटला आहे. याबाबत कुणकूण लागताच आरपीएफचे महानिरीक्षक आणि प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त अमिय नंदन सिन्हा यांनी कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार झोनच्या तिन्ही विभागांमध्ये कारवाईचा बडगा उगारण्यात आला.

किती बॉयफ्रेंड आहेत तुला, मित्राने केली विचारणा आणि...

साधारणपणे 21 मेपासून कारवाई सत्र सुरू आहे. त्याअंतर्गत नागपूर विभागात 3, बिलासपूर विभागात 7 तर रायपूर विभागात 4 अशा एकूण 14 दलालांची धरपकड करण्यात आली. सर्व आरोपी पर्सनल आयडीचा उपयोग करून रेल्वेचे ई-तिकीट मिळवायचे. नंतर त्याची चढ्या दराने विक्री करीत होते. आरोपींकडून सुमारे 53 हजार रुपये किमतीचे पुढील तारखेतील तिकीट जप्त करण्यात आले.

त्यांनी यापूर्वी काढलेल्या तिकिटांचे शुल्क सुमारे 4 लाखांच्या घरात असल्याचीही बाब तपासात पुढे आली. सर्व तिकीट वेगवेगळ्या 63 आयडीचा उपयोग करून काढण्यात आल्या होत्या. तिकीट दलालांविरोधातील कारवाई भविष्यातही सुरूच राहणार असल्याचे आरपीएफने स्पष्ट केले. कारवाई सत्रामुळे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांमध्ये चांगलीच धडकी भरली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fourteen brokers were arrested during the lockdown