'लालपरी' झाली कणखर, मालासह घेतेय धाव 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जून 2020

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने या विपरीत स्थितीत संधी शोधली आहे. प्रवासी वाहतूक सुरू ठेवतानाच शेतमालासह व्यापारी, दुकानदार, कारखानदारांचा माल ट्रकमधून इच्छित स्थळी पोहोचवून देण्याचा विडा उचलला आहे.

नागपूर : लॉकडाउन शिथिल होऊ लागताच गावांना जोडणारी 'लालपरी' कणखर झाली आहे. प्रवासी वाहतुकीसोबतच एसटी महामंडळाने आता मालवाहतुकीचीही कास धरली आहे. नागपूर विभागाकडे चार ट्रक उपलब्ध करून मालवाहतूक सेवेचा अलीकडेच शुभारंभ झाला आहे. आठवडाभराच्या काळात आणखी 10 बसचे मालवाहू ट्रकमध्ये रूपांतरित करण्याची एसटी महामंडळाची तयारी आहे. 

लॉकडाउनच्या काळात अनेक व्यवसाय ठप्प झाले. मालवाहतूकही पूर्णत: बंद होती. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने या विपरीत स्थितीत संधी शोधली आहे. प्रवासी वाहतूक सुरू ठेवतानाच शेतमालासह व्यापारी, दुकानदार, कारखानदारांचा माल ट्रकमधून इच्छित स्थळी पोहोचवून देण्याचा विडा उचलला आहे. सुरक्षित, वक्तशीर आणि किफायतशीर दरात वाहतूक व्यवस्था उपलब्ध होत असल्याने या सेवेलाही प्रतिसाद मिळू लागला आहे. मालवाहतुकीसाठी नागपूर विभागाकडे दोन नवे ट्रक उपलब्ध आहेत. याशिवाय दोन बस मालवाहू करण्याची प्रक्रिया सुरू आहेत. शुक्रवारपर्यंत ही कामे पूर्ण होऊन नागपूर विभागाकडील मालवाहू वाहनांची संख्या 4 होणार आहे. 

हेही वाचा : वरुडच्या दोन युवकांचा शेकदरी धरणात बुडून मृत्यू 

बी-बियाण्यांची पहिली खेप रवाना 
शुभारंभ झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या बुटीबोरी येथील बीज प्रक्रिया केंद्रातून यवतमाळ, बीड आणि सोलापूरला बी-बियाण्यांची खेप पाठविण्यात आली. यातून एसटीला 35 हजारांचा महसूल प्राप्त झाला. पहिली फेरी महामंडळाच्या नागपूर विभागाचे नियंत्रक नीलेश बेलसरे, बीज प्रक्रिया केंद्राचे व्यवस्थापक आनंद खरात यांच्या उपस्थितीत रवाना झाली. यावेळी विभागीय वाहतूक अधिकारी तनुजा काळमेघ, वाहतूक निरीक्षक संदीप गडकिने उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Freight along with passenger transport