प्रेमीयुगुलांच्या गर्दीमुळे फुलला फुटाळा​ 

बुधवार, 10 जून 2020

या संधीचे सोने करण्यासाठी अनेक प्रेमीयुगुल वेगवेगळी बहाणे सांगून फुटाळा आणि अंबाझरी तलावावर चोरी-चोरी भेटी घेणे सुरू आहे. तीन महिन्यांच्या विरहामुळे प्रेमात वाढ झाली असल्यामुळे पहिल्याच भेटीत फुटाळ्याच्या काठावर बसून एकमेकांशी हितगुज आणि भविष्यातील स्वप्न रंगविण्यासाठी प्रेमीयुगुल फुटाळ्यावर येत आहेत.

नागपूर ः गेल्या तीन महिन्यांपासून सुनसान असलेल्या फुटाळ्यावर प्रेमीयुगुलांची गर्दी वाढायला लागली आहे. यामध्ये तरुण-तरुणींसह शाळकरी अल्पवयीन मुले-मुलींच्या संख्येत बरीच वाढ झाली आहे. फुटाळ्यावर येणाऱ्या प्रेमीयुगुलांनी मात्र मास्क आणि फिजिकल डिस्टन्सची ऐशीतैशी केल्याचे चित्र दिसत आहे. 
कोरोनामुळे लॉकडाउन आणि संचारबंदी असल्यामुळे मंदिर किंवा धार्मिक स्थळे बंद होती. उद्याने आणि तलाव आणि इतर प्रेमीयुगुलांचे स्पॉटही बंद होते. त्यामुळे तरुण-तरुणींना घराबाहेर पडण्याचा बहाणाही चालत नव्हता. मात्र, गेल्या पाच दिवसांपासून लॉकडाउनला शिथिलता मिळाली असल्यामुळे प्रेमीयुगुलांना आयतीच संधी मिळाली. त्यातही चेहऱ्याला मास्क लावण्याचीही सोय झाली.

या संधीचे सोने करण्यासाठी अनेक प्रेमीयुगुल वेगवेगळी बहाणे सांगून फुटाळा आणि अंबाझरी तलावावर चोरी-चोरी भेटी घेणे सुरू आहे. तीन महिन्यांच्या विरहामुळे प्रेमात वाढ झाली असल्यामुळे पहिल्याच भेटीत फुटाळ्याच्या काठावर बसून एकमेकांशी हितगुज आणि भविष्यातील स्वप्न रंगविण्यासाठी प्रेमीयुगुल फुटाळ्यावर येत आहेत. त्याचबरोबर तीन महिन्यांतील एकमेकांवरील रुसवे-फुगवे आणि वाद याचाही हिशेब प्रेमीयुगुल पहिल्याच भेटीत करीत असल्याचे चित्र फुटाळ्यावर आहे.

सध्या सर्वच शहर मुक्‍तसंचारासाठी खुले झाले असले तरी फुटाळा आणि अंबाझरीवरील भेट अविस्मरणीय ठरविण्यासाठी लव्हबर्ड लगबग करीत आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून प्रेमीयुगुलांची चांगलीच पंचाईत झाली होती. संचारबंदीमुळे बागबगीच्यासह गल्लीबोळातही प्रेमीयुगुलांना भेटण्याची सोय नव्हती. गेल्या तीन महिन्यांपासून एकमेकांपासून दूर राहिलेल्या प्रेमीयुगुलांना विरह सहन न झाल्यामुळे संचारबंदी उठण्याची प्रतीक्षा करीत होते. शिथिलता मिळताच प्रेमीयुगुल फुटाळ्यावर भेटून एकमेकांवर प्रेमाचा वर्षावर करीत आहेत.

हेही वाचा :  पार्टीत पोहोचला कोरोना रुग्ण अन् नागपूरच्या या परिसरातील ७०० जणांचा झाला घात

रेड रोज आणि लव्ह बलून्स 
फुटाळ्यावर प्रेमीयुगुल आल्यानंतर प्रेयसीसाठी गुलाबाचे फूल आणि हृदयाच्या आकारचे फुग्यांना चांगलीच मागणी वाढली आहे. फुटाळ्यावर प्रेमीयुगुल दिसताना लव्ह बलून्स विकणारे मुले त्यांच्या मागेच तेथे पोहोचतात. तर गुलाबाचे फूलसुद्धा विक्रीस उपलब्ध करण्यात आले आहेत. पहिल्या भेटीत पहिला गुलाब असा रोमांचक क्षण फुटाळ्यावर प्रेमीयुगुल घालवत आहेत. 

पोलिसांची धाकधूक 
गेल्या दोन दिवसांपासून अंबाझरी पोलिस आणि मनपाचे पथक मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करीत आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक जणांना दंडही केला आहे. त्यामुळे फुटाळा परिसरात फिरायला आलेल्या तरुणी-तरुण हे मास्क नसल्यामुळे धावपळ करताना दिसतात. पोलिसांना पाहताच कुणी बॅगमधून मास्क काढते तर कुणी लगेच स्कार्फ बांधत असल्याचे चित्र आहे.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Futala wall blossms due to lovebirds