सफाई कर्मचाऱ्यांच्या सोबतीने काम करणार ‘गार्बेज पिकिंग मशीन’

मंगेश गोमासे  
Wednesday, 30 September 2020

महापालिकेतील सफाई कामगार दररोज रस्ता स्वछ करण्याची कामे करीत असतात. यात झाडूचा वापर होत असल्याने त्यातून उडणारी धूळ कर्मचाऱ्यांच्या नाकातोंडात जाते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना दमा, जॉइंट पेन आणि इतर आजार होतात.

नागपूर  : स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करणाऱ्यांना धुळीमुळे अनेक रोगांची लागण होताना दिसून येते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या कामात सुलभता आणण्यासाठी तीन अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले ‘गार्बेज पिकिंग मशीन’तयार केले आहे. हे मशीन केवळ रस्त्यावरील धूळच स्वच्छ करीत नाही, तर रस्त्यावर पडलेली पाने, प्लॅस्टिक आणि बटल्याही अगदी आरामात उचलू शकते. त्यामुळे आता नागरिकांना रस्त्यावरील धुळीचा त्रास होणार नाही.

महापालिकेतील सफाई कामगार दररोज रस्ता स्वछ करण्याची कामे करीत असतात. यात झाडूचा वापर होत असल्याने त्यातून उडणारी धूळ कर्मचाऱ्यांच्या नाकातोंडात जाते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना दमा, जॉइंट पेन आणि इतर आजार होतात. यामुळे पुढे कामाची क्षमता कमी होत असते. तसेच मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषित होते. याचा त्रास नागरिकांनाही होतो. 

या सगळ्याचा अभ्यास करीत जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील निहाल वरगंटीवार, महेश शेंडे आणि नितीन परशुरामकर या तिघांनी इलेक्ट्रिसिटीचा वापर न करता गार्बेज पिकिंग मशीन तयार केले. या मशीनच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारे धूळ न उडविता ती स्वच्छ करण्यात येते. 

सविस्तर वाचा - शरीरावरील प्रत्येक तीळ काहीतरी सांगतो, जाणून घ्या तिळाचे जीवनातील महत्त्व
 

केवळ धूळ नाही, तर काचेच्या बटल्या, झाडांची पाने आणि इतर जड कचरा उचलण्यात मदत होते. हे मशीन कर्मचाऱ्यांना वापरण्यास दिल्यास त्यांची कामाची क्षमता वाढविण्यास बरीच मदत होईल. बाजारात ‘ट्रक माउंटेड’ अनेक मशीन उपलब्ध आहेत. मात्र, त्यांची किंमत २० ते ३० लाखांच्या घरात आहे. या मशीनच्या माध्यमातून प्लॅस्टिक आणि काचेच्या बाटल्या उचलल्या जात नाही. मात्र, त्या तुलनेत हे मशीन अधिक प्रभावी असून, केवळ ४० हजारात उपलब्ध होईल, असे निहाल वरगंटीवार याने सांगितले.
 

तीन ट्रायल यशस्वी

निहाल वरगंटीवार याच्यासह तिघांनी तयार केलेल्या उत्पादनाचे तीनदा यशस्वी ट्रायल घेण्यात आले आहे. लवकरच याबाबत विद्यार्थी महापालिकेशी बोलणार असल्याचे निहाल याने सांगितले. 

संपादन  : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Garbage picking machine to take care of hygiene health