
उमरेड (नागपूर) :
कैसे आकाश में सूराख हो नहीं सकता
एक पत्थर तो तबीअत से उछालो यारो
दुष्यंत कुमारांच्या या ओळी अंधारात खितपत पडलेल्या जीवाला जगण्याचे बळ देतात. जीवन तसे सोपे नसतेच. अनेक लढाया लढून जीवनरूपी सागरातून नौका हाकावी लागते. संकटे तर पावलोपावली आपली परीक्षा घेत असतात. या संकटांना घाबरून जायचे नसते; लढायचे असते. हे लढणेच आपल्याला प्रकाशाकडे नेत असतात. आपल्या आजूबाजूला अशी अनेक उदाहरणे असतात, ज्या जगण्याची प्रेरणा देत असतात. या स्रोतांकडून ऊर्जा घेऊन मार्गक्रमण करायचे असते.
नुकत्याच जाहीर झालेल्या बारावीच्या परीक्षेत गौरव रमेश पडोळे याने 77.69 टक्के गुण घेतले. निकालात भरारी घेतलेल्या मुलांच्या गुणांची टक्केवारी बघता यात काय विशेष, असे आपल्या मनात येईल. पण, विशेष आहे. गौरवने ज्या विपरीत परिस्थितीत ही कामगिरी केली, ते कळेल तेव्हा कुणीही थक्क झाल्याशिवाय राहणार नाही. स्थानिक अशोक विद्यालयात कला शाखेत शिकणारा गौरव जन्मतः दोन्ही पायांनी अपंग आहे. पाठीचा कणा अत्यंत कमकुवत असल्याने त्याला व्हीलचेअरचा आधार घ्यावा लागतो.
तो दुर्धर आजाराने ग्रस्त आहे. मूत्राशयदेखील निकामी झाले आहे. मूत्रविसर्जनासाठी त्याच्या पोटात नळी टाकली आहे. अशा शारीरिक अडथळ्यांमुळे खरं तर माणूस मानसिकरीत्या खचून जातो. पण गौरवने हार मानली नाही. प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर उंच भरारी घेतली आहे. त्याने बारावीच्या परीक्षेत कला शाखेत 77.69 टक्के मिळवीत सर्वांना चकित केले.
जुना मोटार स्टॅण्ड परिसरात वडिलांची पानटपरी आहे. पण, लॉकडाउनमुळे टपरी बंद असल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा त्यांच्यासमोर जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गौरवाच्या यशात आईचा सिंहाचा वाटा आहे. गौरव जन्मतः अपंग असल्याने आई सुरेखा त्याला कडेवर घेऊन शाळेत जायच्या. मोठा झाल्यानंतर त्याला नियमित व्हीलचेअरवरून शाळेत ने-आण करतात. असे संघर्षमय जीवन जगत मुलाने यश प्राप्त केल्याने आईचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.