घुंघट आणि समाजाचे पाश तोडून 'त्या' क्रिकेट खेळल्या; मेहतर समाजातील धाडसी मुलींचा मैदानावर डंका

नरेंद्र चोरे 
Wednesday, 3 February 2021

नागपूर मेहतर विविध बहूउद्देशीय संस्थेच्या वतीने नुकतेच बेझनबाग मैदानावर सुदर्शन प्रीमियर लीग टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

नागपूर: एरवी मेहतर, वाल्मिकी व सुदर्शन समाजातील मुलींचे आयुष्य साफसफाई आणि कमी दर्जाची कामे करण्यात जाते. समाजातील बंधनांमुळे त्या घराबाहेर तर दूर, चेहऱ्यावरील घुंघटही काढू शकत नाहीत. अशावेळी त्यांच्याकडून क्रिकेटच्या मैदानावर उतरण्याची अपेक्षा करणेही चुकीचे आहे. मात्र आधुनिक विचारसरणीच्या काही धाडसी मुलींनी सर्व पाश तोडून चेंडू-बॅटने कमाल दाखवत समाजापुढे नवा आदर्श ठेवला आहे. त्यांच्या या धाडसाचे समाजबांधवांकडून सर्वत्र कौतुक होत आहे.

नागपूर मेहतर विविध बहूउद्देशीय संस्थेच्या वतीने नुकतेच बेझनबाग मैदानावर सुदर्शन प्रीमियर लीग टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत आतापर्यंत केवळ मुलांचेच क्रिकेट संघ सहभागी व्हायचे. यावर्षी पहिल्यांदाच मेहतर समाजातील मुलींनी क्रिकेटमध्ये हात अजमावला. बेझनबाग मेहतर वस्तीतील १८ ते ४० वयोगटांतील जवळपास ३० मुली व महिलांनी भाग घेऊन आपल्यातील टॅलेंटचा जगाला परिचय करून दिला. 

हेही वाचा - महिलेची घेऊन साथ भूमाफियानं लावली वाट; दृष्टिहीन वृद्धाची हडपली जमीन; नागपुरातील संतापजनक प्रकार 

बगडगंज इलेव्हन आणि नागपूर इलेव्हन यांच्यात झालेल्या सामन्यात नागपूर इलेव्हन संघाने बाजी मारली. सामन्यानंतर महापौर दयाशंकर तिवारी व राजेश हाथीबेड यांनी विजेत्या संघाला ट्रॉफी, मेडल्स व रोख पुरस्कार देऊन सन्मानित केले. मेहतर समाजातील मुलींना चौकार-षटकार मारताना पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी मैदानावर प्रेक्षकांची तुफान गर्दी होती. चांगल्या उपक्रमात सहभागी झाल्याचा आनंद नागपूर इलेव्हनची कर्णधार रिना उसरबरसे व बगडगंजची कर्णधार अरुणा बारसे यांनी बोलून दाखविला.

या उपक्रमाबद्दल बोलताना सामाजिक कार्यकर्त्या प्रीती हजारे म्हणाल्या, मेहतर समाजातील मुली नेहमीच साडी आणि घुंघटमध्ये राहात आल्या आहेत. त्यांना खेळ खेळण्याचे व खुलेपणाने विचार व्यक्त करण्याचेही स्वातंत्र्य नाही. कमी शिकलेल्या जवळपास ९० टक्के मुली वर्षानुवर्षे घाण व साफसफाईची कामे करून जीवन जगत आहेत. अशा मुली युनिफॉर्म घालून क्रिकेट खेळाव्या, ही फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळे साहजिकच त्यांचे कौतुकही झाले. या निमित्ताने त्यांच्यातील सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळाले. मेहतर समाजात नवी क्रांती व चेतना घडून आली आहे. या क्रिकेटर मुलींपासून प्रेरणा घेऊन भविष्यात आणखी मोठ्या प्रमाणावर मुली क्रिकेट खेळून समाजाच्या मुख्य प्रवाहात येतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा - बालकांना सॅनिटायझर पाजल्याप्रकरणी समोर आली धक्कादायक माहिती; 'या' गोष्टीकडे होतं...

'महिला क्रिकेटचा विचार समोर आल्यानंतर आयोजकांनी आम्हाला सपोर्ट केला. त्यानंतर बेझनबाग मेहतर वस्तीतील मुलींना एकत्र केले. दोन टिम्स तयार केल्या. थोड्याफार प्रॅक्टिसनंतर मैदानात उतरल्या आणि चॅम्पियनप्रमाणे खेळ करत प्रेक्षकांची मने जिंकली. मुलींसाठी हा अनुभव खरोखरच अविस्मरणीय होता. केवळ क्रिकेट खेळणे हा आमचा उद्देश नव्हता. संधी आणि व्यासपीठ मिळाल्यास आम्ही काहीही करू शकतो, हे या मुलींनी दाखवून दिले.'
-प्रीती हजारे, 
सामाजिक कार्यकर्त्या

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girls from Mehtar community played cricket in Nagpur