छत्रपती व एकलव्य विजेत्यांना थेट नोकरी द्या  : नागपुरातील खेळाडू झाले आक्रमक 

नरेंद्र चोरे
Monday, 9 November 2020

क्रीडा आरक्षणात शिवछत्रपती व एकलव्य क्रीडा पुरस्कार विजेत्या खेळाडूंना थेट नियुक्ती देण्यात यावी, ही त्यांची प्रमुख मागणी आहे. याशिवाय क्रीडा आरक्षण हे गुणांकन पद्धतीने लागू करावे आणि एकलव्य पुरस्काराचे नाव बदलून शिवछत्रपती पुरस्कार करावे अशीही त्यांची मागणी आहे.

नागपूर : महाराष्ट्राला विविध खेळांमध्ये नावलौकिक मिळवून देणाऱ्या नागपुरातील शिवछत्रपती व एकलव्य क्रीडा पुरस्कार विजेत्या खेळाडूंना आता राज्य सरकारकडून थेट नोकरी हवी आहे. थेट नियुक्ती व अन्य मागण्यांसाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू आक्रमक झाले असून, आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. 

महाराष्ट्र युवा क्रीडा संघटनेच्या वतीने शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त प्रा. सागर मगरे यांच्या नेतृत्वात सुरू असलेले मिशन क्रीडा आरक्षण आणि नागपूर युवा क्रीडा संघटनेच्या शिवछत्रपती पुरस्कारविजेती दामिनी रंभाड हिच्या नेतृत्वात रविवारी नागपूर जिल्ह्यातील समन्वयकांसोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रमुख समन्वयक शिवछत्रपती पुरस्कार विजेते सागर गुल्हाणे यांनी खेळाडूंच्या अडचणी व मागणींची उपस्थितांना माहिती दिली. क्रीडा आरक्षणात शिवछत्रपती व एकलव्य क्रीडा पुरस्कार विजेत्या खेळाडूंना थेट नियुक्ती देण्यात यावी, ही त्यांची प्रमुख मागणी आहे. याशिवाय क्रीडा आरक्षण हे गुणांकन पद्धतीने लागू करावे आणि एकलव्य पुरस्काराचे नाव बदलून शिवछत्रपती पुरस्कार करावे अशीही त्यांची मागणी आहे. तसेच बेरोजगार दिव्यांग खेळाडूंना पोलिस व वन विभागात आरक्षण मिळावे आणि क्रीडा क्षेत्रात सुरू असलेली बोगसगिरी थांबविण्याचीही त्यांनी शासनाकडे मागणी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्र युवा क्रीडा संघटनेच्या वतीने संपूर्ण राज्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. यासंदर्भात खेळाडू लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा मंत्री सुनील केदार व क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांची भेट घेणार आहेत. 

 

हेही वाचा : *आईने टाकलेल्या बाळासाठी मंगेशी झाली माई; उमेद संकल्प संस्थेने घेतले दत्तक*

 

बैठकीला नंदकुणाल धनविजय, जिल्ह्याचे प्रमुख समन्वयक महंमद शोएब, रौनक खांबलकर, अंकित गजभिये, अभिलाष बारापात्रे, एकलव्य पुरस्कारविजेते संदीप गवई, रोशनी रिंके-धांडे, प्रतिमा बोंडे, अमोल सातपुते, रजत खंगार, कमलेश लांजेवार, पीयूष आकरे, प्राची बनोदे, आकाश ठाकरे, दीपाली सबाने, सोनाली मोकाशे, अजित बन, ऋषिकेश देशमुख, प्रा. पराग बन्सोले, पंकज करपे, अभिषेक ठवरे इत्यादी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू उपस्थित होते. 

 
' वर्षभर मेहनत करून अन शिवछत्रपती व एकलव्यसारखे प्रतिष्ठित पुरस्कार मिळवूनही राज्यातील बरेच खेळाडू सध्या बेरोजगार आहेत. उदरनिर्वाहासाठी त्यांना छोटीमोठी कामे करावी लागत आहेत. सरकारने पुरस्कारविजेत्यांना थेट नोकऱ्या दिल्यास त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटू शकतो. शासनाने यासंदर्भात सकारात्मक निर्णय घ्यावा एवढीच आमची अपेक्षा आहे.' 

-दामिनी रंभाड, शिवछत्रपती पुरस्कारविजेती खेळाडू  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Give Jobs directly to Chhatrapati and Eklavya Awardies: Nagpur Players demand