आमच्याकडे खूप सारे चोरीचे सोने आहे, नंदनवनमध्ये लुबाडणारी टोळी सक्रिय

अनिल कांबळे
Sunday, 31 May 2020

सोनाराला मनी दाखवून खरा असल्याची खात्री पटवून घेतली. आठ ते दहा दिवस पती-पत्नीने विचार केला. तीन लाखांची फायदा होत असून पत्नीची कंठीमाळ घालण्याचा शौकसुद्धा पूर्ण होत असल्यामुळे एका लाखांत कंठीमाळ विकत घेण्याचे दोघांनीही ठरविले.

नागपूर : चार लाखांची सोन्याची कंठीमाळ केवळ एका लाखात खरेदी करण्याचा मोह एका दाम्पत्याला आवरला नाही. त्यांनी लगेच सोने विक्रेत्यांना फोन करून एक लाखांची रक्‍कम सोपवली आणि कंठीमाळ हस्तगत करीत आनंद व्यक्‍त केला. मात्र, तो आनंद औटघटकेचाच ठरला. दोन ठगसेनांनी नकली माळ दाम्पत्याच्या हाती ठेवली आणि पोबारा केला. या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्मला समर्थ (वय 42) आणि पती नंदकिशोर समर्थ (वय 48, विद्यानगर) हे दोघेही भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांचे गाडगेनगरात भाजीपाल्याचे मोठे दुकान आहे. 12 मे रोजी दोन युवक रात्री दहा साडेनऊ वाजताच्या सुमारात दुकानावर आले. त्यांनी भाजी विकत घेतली आणि निर्मला यांच्याशी चर्चा केली. "आमच्याकडे खूप सारे चोरीचे सोने आहे. ते आम्हाला विकायचे आहे. परंतु बाहेर पोलिस पकडतील, म्हणून चार लाखांची कंठीमाळ एक लाख रूपयांत देण्याची तयारी आहे.' असे त्या दोघांपैकी एकाने निर्मला यांना म्हटले.

महिलेला कंठीमाळ गळ्यात घालण्याचा मोह आवरला नाही. तिने लगेच पतीला "अहो इकडे या, एक काम आहे.' असे म्हणून आवाज दिला. तिने पतीशी चर्चा केली आणि चार लाखांची कंठीमाळ एका लाखांत विकत घेण्यासाठी तयार केले. दोघांनीही त्या युवकाला माळ दाखविण्यास सांगितले. माळे बघितल्यानंतर निर्मला यांना मोह सुटला. युवकांनी माळेतील एक मनी काढून निर्मला यांच्या हातावर ठेवला. "सोनाराकडे जा आणि खात्री करा.' असे बोलून त्यांनी निर्मला यांच्या हाती एक चिठ्‌ठी देऊन आपला मोबाईल क्रमांक दिला. दुसऱ्या दिवशी दोघेही पती-पत्नी सोनाराकडे गेले.

सोनाराला मनी दाखवून खरा असल्याची खात्री पटवून घेतली. आठ ते दहा दिवस पती-पत्नीने विचार केला. तीन लाखांची फायदा होत असून पत्नीची कंठीमाळ घालण्याचा शौकसुद्धा पूर्ण होत असल्यामुळे एका लाखांत कंठीमाळ विकत घेण्याचे दोघांनीही ठरविले. पत्नीच्या हातात कंठीमाळ दिली. तिने गळ्यात घालून बघितली. परंतु निर्मला यांना थोडा संशय आला. त्यामुळे त्यांनी सोनाराकडून पुन्हा एकदा तपासून घेण्याचा निर्णय घेतला. दोघेही पती-पत्नी सराफा दुकानात गेले. सोनाराने कंठीमाळ बनावट असल्याचे सांगताच निर्मला आणि नंदकिशोर यांच्या पायाखालीच जमीन सरकली.

 

त्यांचा आला फोन

गुरुवारी 28 मे रोजी दोन्ही आरोपी युवकांचा समर्थ दाम्पत्याला फोन आला. पैसे गोळा झाले का? अशी विचारणा केली. त्यांनी होकार देताच शुक्रवारी पहाटे सहा वाजता छोटा ताजबागसमोर माळ घेऊन जाण्यास सांगितले. नंदकिशोर पहाटेच तयार झाले आणि एक लाख रुपये बॅगेत घेऊन पोहचले. ताजबागसमोर दोन्ही युवक त्यांची वाट पाहत बसले होते. नंदकिशोर यांनी लगेच पैशाची बॅग युवकांच्या हातात दिली आणि कंठीमाळ ताब्यात घेतली आणि घरी परत आले.

तुकाराम मुंढे हुकुमशाहसारखे वागतात, नागपुरातील या कॉंग्रेसे आमदाराने डागली तोफ

 

पोलिसांत केली तक्रार

समर्थ दाम्पत्यांनी डोक्‍यावर हात मारून घेतला. भाजीपाला विक्रीतून जमा केलेली एका लाखाची रक्‍कम एका झटक्‍यात ठगबाजांनी उडविली. पोलिसांत जायचे की नाही? याबाबत त्यांनी विचार केला. शेवटी नंदनवन पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी तक्रारीवरून दोन युवकांविरूद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला.  

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: giving a fake necklace of gold The couple Cheating