गच्चीवरील बागेतील भाज्या थेट किचनमध्ये

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 जून 2020

5 जून हा जागतिक पर्यावरणदिन म्हणून साजरा केला जाताे. या पर्यावरणाचे रक्षण करणे  प्रत्येकाची जबाबदारी आहे. नागपूर येथील एक कुटूंब घराच्या गच्चीवर भाजीपाला आणि काही फळांची शेती करते. या माध्यमातून विषमुक्त भाज्यांचे उत्पादन ते घेत आहेत.

नागपूर : वाढत्या शहरीकरणामुळे शेती क्षेत्रामध्ये घट होत आहे. त्याचा परिणाम फळ, भाजीपाला उत्पादन आणि मागणी, पुरवठ्यावर झालेला आढळून येतो. त्याचा गैरफायदा घेऊन अनेकदा आपल्याला नित्कृष्ट दर्जाच्या भाजीपाल्याचा पुरवठा होतो. त्या अनुषंगाने, शहरातील रहिवासी प्रतीक शेंदरे यांनी "अर्बन बाग' या मॉडर्न सिटी फार्मर कम्युनिटीची स्थापना केली.
गेल्या अनेक वर्षांपासून ते खताचा व्यवसाय करतात. तर, छंद म्हणून घराच्या गच्चीवर सुरू केलेल्या बागेचे रूपांतर त्यांनी आता व्यवसायामध्ये केले आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी हा व्यवसाय सुरू केला असून आजवर किमान शंभर घरी त्यांनी ताजी, सकस, निरोगी भाजी पुरविली आहे. हा उपक्रम राबविण्यापूर्वी त्यांनी तज्ज्ञांद्वारे जागेची पाहणी केली. त्यांच्या सुचनेनुसार आवश्‍यक असलेले शेड, माती, ग्रो-बॅग्स, संरक्षक जाळीची निवड केली.

वाचा- सावधान!  नागपुरात मास्क न वापरल्यास भारावा लागेल दंड
बॅग्समध्ये योग्य मिश्रण भरल्यानंतर हंगामी व वर्षभर पीक घेऊ शकणाऱ्या पिकांचे नियोजन केले. तसेच, पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन आणि काही स्वयंचलित उपकरणांची निवड त्यांनी केली. लागवड केल्यानंतर महिन्याभरामध्येच त्यांना आपल्या बागेतील ताज्या भाज्यांचा आस्वाद घ्यायला मिळाला. कुटुंबीयांसाठी वर्षभर सेंद्रिय भाजी मिळत असल्याने हा उपक्रम राबविणाऱ्या प्रणाली लुटे, नितीश चौधरी, डॉ. राठोड यांनी आनंद व्यक्त केला. अर्बन बागतर्फे बनविण्यात आलेल्या बागांची देखभाल 40 टक्के बाग मालकच करीत आहेत. बियाणे पेरण्यापासून ते पीक व्यवस्थापनापर्यंत प्रशिक्षण दिल्यागेल्याने ते आज आत्मनिर्भर बनले आहेत.

पहिल्यांच वर्षी ग्राहकांकडून अपेक्षेपेक्षा दुपटीने प्रतिसाद मिळाला. अशा बागा बघून अनेकांनी संपर्क करणे सुरू केले. चव घेतल्यानंतर ग्राहकांकडून ऐकायला मिळणाऱ्या प्रतिक्रिया समाधान देऊन जातात. यातून सेंद्रिय खाद्यपदार्थांबद्दल जनजागृती झाली.- प्रतीक शेंदरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Go and have a vegetables from Terrace farming