सावनेरात कुठेही जा, कधीही जा, हमखास होते कचऱ्याचे दर्शन

विजय पांडे
Monday, 19 October 2020

स्वच्छ शहर व प्लास्टिकमुक्त करण्यासाठी स्वच्छता क्रमवारीत सुधारणा करण्यासाठी सावनेर सिटी कौन्सिलतर्फे सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.  परंतू नगरपरिषदेचे सफाई कामगार व कंत्राटदाराच्या मनमानीने या मोहिमेला तडा देण्याचा प्रयत्न केला जात आहे.  सफाई कामगारांच्या मनमानीमुळे सर्व प्रभागांत कचरा  थातूरमातूर उचलला जातो किंवा कचरा नियमित उचलला जात नाही. 

सावनेर (जि.नागपूर) :‘मराठीचे शेक्सपिअर’ महाराष्टातील साहित्यप्रभू, बहुप्रतिभाशाली व महाकवी गोविंद्राग्रज या नावाने काव्यलेखन करणारे, नाटककार राम गणेश गडकरी यांच्या वास्तव्याने सुपरिचित असलेली सावनेर नगरी आज बदलत्या काळात कचरानगरी म्हणून प्रसिद्ध होत आहे. स्वच्छ शहर व प्लास्टिकमुक्त करण्यासाठी स्वच्छता क्रमवारीत सुधारणा करण्यासाठी सावनेर सिटी कौन्सिलतर्फे सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.  परंतू नगरपरिषदेचे सफाई कामगार व कंत्राटदाराच्या मनमानीने या मोहिमेला तडा देण्याचा प्रयत्न केला जात आहे.  सफाई कामगारांच्या मनमानीमुळे सर्व प्रभागांत कचरा  थातूरमातूर उचलला जातो किंवा कचरा नियमित उचलला जात नाही.  या कारणास्तव प्रभागात कचऱ्‍याचे ढीग जागोजागी  पहावयास मिळत आहेत.  रहिवाशांच्या तक्रारीनंतरही कर्मचारी कचरा उचलत नाहीत. हे काम आमच्याकडे नाही, असे बतावणी केली जात आहे. हे काम दुसऱ्‍याकडे असल्याचे कारण सांगून जवाबदारी झटकण्यात येत आहे.

अधिक वाचाः जिंजर ते अंबाडा रस्त्यावर दोन महिन्यांपासून अवैध वृक्षतोड, वनविभागाचे दुर्लक्ष
 

जागोजागी कचऱ्‍याचे ढीग
सावनेर नगरपरिषदेच्या सफाई कामगारांच्या मनमानीमुळे शहरातील कचराकुंड्या मोठ्या प्रमाणात बसविण्यात येत आहेत.  लोकांकडून रस्त्यावर फेकलेला कचरा नियमित न उचलल्यामुळे जनतेला कचऱ्याच्या ढिगातून मार्गक्रमण करावे लागत आहे. कचरा उचलण्याची गाडी किंवा सफाई कामगार वॉर्डातील कचरा उचलण्यासाठी नियमित येत नाहीत, अशी स्थानिकांची तक्रार आहे.  यामुळे वाटेवर जागोजागी कचऱ्‍याचे ढीग पडलेले दिसतात. नगर परिषदेची कचरा संकलन करणारी गाडी सकाळी फक्त काही वॉर्डांमध्ये जाते. या कारणास्तव अन्य प्रभागात नियमितपणे कचरा गोळा न केल्याने कचऱ्याचे साम्राज्य दिवसेंदिवस वाढत आहे. कचऱ्याचे ढीग रस्त्यावर पडत आहेत. काही ठरावीक राजकीय नेते, मोठे अधिकारी यांच्या राहत्या भागात नियमित कचरा गाडी व सफाई कामगार जातात, असे बोलले जात आहे.

हेही वाचाः मंदिर कुलूपबंद, तरि अधिक मासात ‘झुंज’ बंधाऱ्यावर वाढली पर्यटकांची झुंड
 

डस्टबिन गहाळ
 स्वच्छता सर्वेक्षणांतर्गत कोरडा व ओला कचरा जमा करण्यासाठी नगर परिषदेकडून प्रभाग व बाजारात ‘डस्टबीन’ बसविण्यात आले होते.  परंतू असामाजिक त्तव आणि भटक्या गुरांनी डस्टबिनची वाट लावून टाकली आहे. तोडफोड झालेल्या  काही डस्टबिन लावलेल्या जागेवरुन अचानक नाहीशा झालेल्या आहेत. डस्टबिन फुटल्याने रस्त्यावर दुकाने व घरातून निघणारा कचरा रस्त्यावर पसरलेला दिसतो.

गाड्या ठीक झाल्यावर पाहू!
 शहरातील दररोज कचरा गोळा करण्याचे निर्देश दिलेल्या कंत्राटदारांच्या पर्यवेक्षकास देण्यात आले आहेत. काही कचरागाड्या खराब असल्यामुळे शहरातील काहीच कचरा उचलून घेत आहेत. गाड्या ठीक झाल्यावर सर्व प्रभागातून कचरा उचलण्यास सुरवात होईल.
 -रवींद्र भेलावे
मुख्याधिकारी
 न.प.सावनेर

संपादनः विजयकुमार राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Go anywhere, anytime in Savannah, it's always a sight to behold