सोने लपविण्याची अशीही शक्‍कल, नया जमाना, नयी सोच

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 जानेवारी 2020

शारजाहून येणाऱ्या एअर अरेबियाच्या विमानातून चोरून सोन्याची खेप आणली जात असल्याची गुप्त माहिती विमानतळावरील कस्टम विभागाच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार मध्यरात्री कारवाईसाठी सापळा रचण्यात आला. एअर अरेबियाचे विमान पहाटे 3.45 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले.

नागपूर : कस्टम विभागाने गुप्त माहितीच्या आधारे शुक्रवारी नागपूर विमानतळावर कारवाई करीत 30 लाखांचे सोने जप्त केले. गुदद्वारामध्ये लपवून तीन प्रवासी हे सोने नागपुरात घेऊन आले होते.
शारजाहून येणाऱ्या एअर अरेबियाच्या विमानातून चोरून सोन्याची खेप आणली जात असल्याची गुप्त माहिती विमानतळावरील कस्टम विभागाच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार मध्यरात्री कारवाईसाठी सापळा रचण्यात आला. एअर अरेबियाचे विमान पहाटे 3.45 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना बाहेर पडण्यास मज्जाव केला. तपासणीनंतर जाता येईल, अशी सूचना देतानाच प्रवाशांकडून मदतीची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

सविस्तर वाचा - पर्यटकाला वाघिणीचा आवाज काढणे पडले महागात

तपासणीदरम्यान तीन प्रवाशांनी शरीरात सोने लपविल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी अर्धा किलोपेक्षा अधिक सोने "पावडर फॉर्म'मध्ये प्लॅस्टिकमध्ये टाकून गुदद्वारातून ते शरीरात ढकलले होते. सोने जप्त करून नियमानुसार कारवाईनंतर तिन्ही प्रवाशांना सोडून देण्यात आले. तिन्ही प्रवासी उत्तर भारतातील रहिवासी असल्याची माहिती आहे.
विमानातून चोरट्यामार्गाने सोने आणण्याच्या घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा विचार केल्यास दुबई सोने खरेदीचे हब आहे. कमी किमतीत चांगल्या दर्जाचे सोने मिळत असल्याने दुबईतून सोने आणण्यावर अनेकांचा भर असतो. कस्टम ड्यूटी चुकविण्यासाठी चोरट्या पद्धतीचा अवलंब केला जातो. अमेरिका आणि इराण दरम्यानचे संबंध ताणले गेले आहे. त्याचा परिणाम जगभरात दिसून येत आहे. इंधनासोबतच सोन्याचे दर चांगलेच वधारले आहे.

सोने हा सर्वोत्तम पर्याय

सोन्याच्या किमतीतील वाढ "इनकॅश' करून घेण्यासाठी सोने हा सर्वोत्तम पर्याय आहे. देशविघातक शक्तींना निधी उपलब्ध करून देण्यासाठीही यापूर्वी अशा प्रकारे सोने आणले गेले असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यामुळे प्रकरणाचा बारकाईने तपास केला जात असल्याची माहिती आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gold smuggling in sharaja-nagpur plane