कोरोनाने हरविले त्या हजारो कारागिरांचे `सोनेरी` दिवस 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 12 May 2020

कोरोनामुळे करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे त्यांना कामच मिळत नाही. परिणामी त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. काम पूर्णतः बंद झाल्याने परिवाराचा गाडा आता कसा हाकायचा, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. 

नागपूर : सराफा व्यापाऱ्यांसह सोन्याचे दागिने घडविणाऱ्या कारागिरांसाठी दरवर्षी मार्च, एप्रिल आणि मे हे तीन महिने "अच्छे दिन' घेऊन येतात. या सोनेरी दिवसांतील तब्बल 50 दिवसांच्या टाळेबंदीमुळे सोन्यावर नक्षीकाम करणाऱ्या जिल्ह्यातील 20 हजार कारागिरांवर बेरोजगारीची संक्रांत आली. त्यामुळे कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा, असा गंभीर प्रश्‍न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. 

नागपूर शहर मध्य भारतातील सर्वात मोठी सराफा बाजारपेठ आहे. गलाई, गठाई, डाय कटिंग करणाऱ्यांसह सोन्याचे दागिने तयार करणारे जवळपास 20 हजारापेक्षा अधिक कारागीर शहरात आहेत. यातील बहुतांश कारागीर मूळचे पश्‍चिम बंगालचे तर गलाई आणि गठाई करणारे कोल्हापूर व सोलापूरचे आहेत. सर्व कारागीर विखुरले असून शहरातच राहूनच कुटुंबाचे पालनपोषण करतात. लग्नसराईच्या तीन महिन्यांच्या सिझनसाठी कारागिरांचे जानेवारीपासूनच काम सुरू होते. पण यावर्षी कोरोनामुळे करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे त्यांना कामच मिळत नाही. परिणामी त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. काम पूर्णतः बंद झाल्याने परिवाराचा गाडा आता कसा हाकायचा, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. 

कारागिरांचे काम कंत्राटी आणि विश्‍वासावर असते. त्यांच्या हाताला कामच नसल्याने त्यांना मदत करण्यास प्रारंभी काही प्रमाणात व्यापारी आणि सामाजिक संस्था पुढे आल्या. त्या त्यांना जीवनावश्‍यक वस्तूंच्या स्वरूपात मदत करीत आहेत. पण ही मदत आता किती दिवस मिळणार, हा गंभीर प्रश्न आहे. स्वाभीमानाने जगणाऱ्या कामगारांवर हातात कामच नसल्याने पुढे काय करायचे, याची चिंता सतावत आहे. हातात कटोरा घेण्याचीच पाळी त्यांच्यावर आली आहे. कारागिरांच्या हातात रोख रक्कम नसल्याने औषधोपचार आणि आवश्‍यक वस्तूंची खरेदी करणे शक्‍य नाही. ही स्थिती किती दिवस राहणार, याबद्दलही अनिश्‍चितता आहे. 

अवश्य वाचा-  ही तर माणुसकीची हद्दच! गावच्या रक्षकानेच केली विलगीकरण कक्षातील महिलेला शरीरसुखाची मागणी

17 तारखेनंतर शहरातील रेड झोनमधील टाळेबंदी अजून वाढविण्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. त्यामुळे कारागीर अधिकच चिंतेत सापडले असून ते संघटित नसल्याने सरकारकडून मदतही मिळणार नाही. या कारागिरांना नवयुवक सराफा असोसिएशनच्या माध्यमातून धान्याची किट वाटप करण्यात आले आहे. त्यांच्याजवळील किट आता संपल्या असल्या तरी कागागिरांना मदत करण्यासाठी असोसिएशनने कंबर कसली आहे, असे असोसिएशनचे संस्थापक सदस्य राजेश दाभाडे यांनी "सकाळ'ला सांगितले. 

लग्नसराईसाठी सराफा व्यापारी सज्ज झाले होते. कोट्यवधी रुपयांच्या मालाची बुकींग आणि ऑर्डरही देण्यात आल्या होत्या. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात 19 मार्चपासून टाळेबंदी लावण्यात आली. त्यामुळे सराफांचे सर्व व्यवहार ठप्प झालेत. साडेतीन मुहूर्तापैकी असलेला गुढीपाडवा आणि अक्षय तृतीया हे दोन्ही महत्त्वाचे सण टाळेबंदीमुळे वाया गेले. परिणामी यंदाच्या मोसमात कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. अक्षय तृतीयेला काही व्यापाऱ्यांनी ऑनलाईन व्यवहार केले. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला असला तरी त्यात उत्साह नव्हता. टाळेबंदीमुळे व्यवसायाची साखळी तुटली आहे. नागपूर जिल्ह्यातील तीन हजारांपेक्षा जास्त छोट्या सराफा व्यावसायिकांवरही आर्थिक संकट आले आहे. त्यातील अनेकजण कारागीर आहेत. लग्नसराई नसल्याने दागिन्यांचे ऑर्डरच बंद आहेत. 

कलाकुसरीत हातखंडा 

चपलाकंठी, बांगड्या, अष्टपैलू पाटल्या, बदामी अंगठ्या, नथ, कंठी मंगळसूत्र, डोरले आदींच्या निर्मितीत नागपुरातील कारागिरांचा हातखंडा आहे. जेवढे काम करेल, तेवढीच कारागिरी त्यांना मिळत असते. टाळेबंदीमुळे संपूर्ण खरेदीचा सीझनच थांबल्याने कुणाकडेही काम नाही. त्यांना सरकारकडून आर्थिक मदतीची अपेक्षा आहे. मात्र, संघटीत नसल्याने मदत कशी मिळेल असाही त्यांचा सवाल आहे. त्यामुळे कलाकुसरीत कौशल्य मिळविलेल्या कारागिरांसमोर आर्थिक, सामाजिक अशा दोन्हीच्या अडचणीत ते सापडले आहेत. 

टाळेबंदीमुळे सोन्याचे दागिने तयार करणारे कारागीर आर्थिक संकटात सापडले आहेत. देशस्तरावरील संघटना जेम्स आणि ज्वेलरीतर्फे त्यांना आर्थिक मदत करण्यात येत आहे. कारागिरांचे आधार कार्ड घेऊन मुंबई कार्यालयाला पाठवून त्यांच्या खात्यात 1500 रुपयांची रोख रक्कम दिली जात आहे. या माध्यमातून शहरातील अधिकाधिक कारागिरांना मदत करण्याचा प्रयत्न आहे. आतापर्यंत देशातील हजारो कारागिरांना आर्थिक मदत केली असून ती सहा कोटी रुपयांच्या घरात आहे. 
- राजेश रोकडे, 
संचालक, जेम्स ऍण्ड ज्वेलरी असोसिएशन. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Goldsmith lost their golden days due to corona