अमेरीकेनंतर या जिल्ह्यातील वाघिणीला केले क्‍वारंटाइन, राज्यातील पहिलीच घटना

gondia tiger quarantine in gorewada
gondia tiger quarantine in gorewada

नागपूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने दिलेल्या निर्देशानुसार आता शहराच्या बाहेरून आणलेल्या वन्यप्राण्यांनाही विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहेत. गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव वन परिक्षेत्रात जेरबंद केलेल्या वाघिणीला गोरेवाडा बचाव केंद्रात आणले असून, पंधरा दिवसासाठी विलगीकरण कक्षात ठेवले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर जेरबंद केलेल्या वाघिणीला प्रथमच सीझेडएच्या निर्देशानुसार विलगीकरण कक्षात ठेवण्यात आल्याची राज्यातील पहिलीच घटना आहे. 

अमेरीकेतील न्यूयॉर्क येथील ब्रॉंन्क्‍स झूमधील वाघाला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर लगेच केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने देशातील सर्वच प्राणिसंग्रहालयाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार बाहेरून आलेल्या वन्यप्राण्यांना दोन आठवडे विलगीकरण कक्षात ठेवण्यात यावे असे निर्देश दिले आहेत. त्यानुसार अंमलबजावणी केली जात आहे. गोरेवाड्यात आणल्यानंतर वाघिणीच्या रक्त आणि विष्ठेचे नमुने घेतले असून, तपासणीही करण्यात येत आहे.

प्रथम दर्शनी वाघिणीची तब्बेत सुस्थितीत असल्याचे दिसत असले तरी नमुन्याचा अहवाल आल्यानंतरच त्यावर भाष्य करणे योग्य ठरेल असे पशुवैद्यकीय डॉक्‍टरांचे म्हणणे आहे. सीसीटीव्हीद्वारे वाघिणीसह प्राण्यांवर आणि त्यांच्या वर्तनावर 24 तास लक्ष ठेवले जात आहे. देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही विशेष काळजी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. प्राण्यांना खाऊ घालताना कर्मचाऱ्यांचा कमीत कमी संपर्क येईल, अशी काळजी घ्यावी. आजारी प्राण्यांचे तातडीने विलगीकरण करावे, अशा स्पष्ट सूचना केल्या आहेत. 

वाघिणीला केले होते जेरबंद

गोरेगाव, तिरोडा वनपरिक्षेत्रात मार्च व एप्रिल महिन्यात वाघिणीच्या हल्ल्यात प्रत्येकी एक महिला व पुरुषाला ठार मारले होते. एनटीसीएच्या मार्गदर्शक सूचनेनुसार तांत्रिक समिती गठित केली होती. समितीने वाघिणीचा अभ्यास केला. यातून तो ब्रह्मपुरी वनविभागातून आल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरण संस्था नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार, तांत्रिक समितीचा सल्ला घेऊन प्रधान मुख्य वन्यजीव संरक्षक (वन्यजीव) यांनी वाघिणीला जेरबंद करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुरुवारी तिला जेरबंद केल्यानंतर गोरेवाडा बचाव केंद्रात आणले आहे.

समितीच्या निर्देशानुसार ठरेल पुढील दिशा

वाघिणीला 15 दिवस विलगीकरण कक्षात ठेवल्यानंतर तिला वन्यप्राणी बचाव केंद्रातील पिंजऱ्यात हलविण्यात येणार आहे. दरम्यान, एनटीसीएच्या निर्देशानुसार वाघिणीला सोडण्यासाठी तयार करण्यात आलेल्या चार सदस्यांच्या समितीच्या निर्देशानुसार पुढील दिशा निश्‍चित होणार आहे. वाघिणी मनुष्यभक्षक आहे की नाही ठरल्यानंतर तिला जंगलात मुक्त करण्याचा अथवा पिंजऱ्यातच ठेवायचे याबद्दलही निर्णय हीच समिती घेणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com