टाळेबंदी काळात थंडावलेले भाड्याच्या घरांचे व्यवहार पुन्हा रुळावर; लवकर येणार ‘अच्छे दिन’

राजेश रामपूरकर
Tuesday, 12 January 2021

टाळेबंदीच्या काळात महाविद्यालये, कारखाने आणि इतरही प्रतिष्ठाने बंद असल्याने अनेकांनी आपली घरे जवळ केली होती. दरम्यान, अनेकांचे पगारही बंद झाल्याने आणि रोजगार गेल्याने घराचा मार्ग पकडला होता. अद्यापही महाविद्यालये, कोचिंग क्लासेस सुरू झालेले नाहीत.

नागपूर : टाळेबंदी काळात थंडावलेले भाड्याच्या घरांचे व्यवहार पुन्हा रुळावर येऊ लागले आहेत. मागील पाच ते सहा महिन्यांपासून प्रलंबित भाडे आणि भाड्याची नवीन घरे घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. महाविद्यालये आणि शाळा सुरू झाल्यानंतर त्यात अजून वाढ होतील, असे एजंटचे म्हणणे आहे.

दिवाळीनंतर घरांच्या भाडेकराराच्या व्यवहारात वाढ झाली आहे. अर्थात, गेल्या वर्षीच्या तुलनेत ती कमीच होती. ऑक्टोबरपासून अर्थव्यवस्था भरारी घेत असल्याचे चित्र दिसताच अनेकांनी प्रलंबित ठेवलेल्या भाड्याचे घर घेण्यास सुरुवात केली. टाळेबंदीच्या कडक अंमलबजावणीमुळे एप्रिल ते सप्टेंबर या काळात शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता घरभाड्याचे शहरातील व्यवहार पूर्णपणे थंडावले होते.

नागपूर जिल्ह्यातील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा

जूनमध्ये टाळेबंदी शिथिलीकरणाची प्रक्रिया सुरू झाल्यावर या व्यवहारांना थोडीफार सुरुवात झाली. मात्र, कोरोनामुळे आणि रोजगारावर गदा आल्याने अनेकांनी गाव गाठले. परिणामी मागणी कमी होऊन शहरातील बहुतांश घरे रिकामी झाली. त्यातच आर्थिक चणचणीमुळे आधीचेच प्रलंबित भाडे देणे शक्य नसल्याचे अनेकांनी घरमालकांना दूरध्वनीद्वारे कळविले.

मात्र, सप्टेंबरपासून व्यवसाय आणि रोजगार काही प्रमाणात सुरू झाल्याने घर भाड्याने हवे, अशी विचारणा केली जाऊ लागली. त्यामुळे तीन महिन्यांत भाड्याच्या घरांच्या नोंदणीत वाढ झाली आहे, अशी माहिती रिअल इस्टेट एजंट राजेश पाटील यांनी दिली.

टाळेबंदीच्या काळात महाविद्यालये, कारखाने आणि इतरही प्रतिष्ठाने बंद असल्याने अनेकांनी आपली घरे जवळ केली होती. दरम्यान, अनेकांचे पगारही बंद झाल्याने आणि रोजगार गेल्याने घराचा मार्ग पकडला होता. अद्यापही महाविद्यालये, कोचिंग क्लासेस सुरू झालेले नाहीत.

अधिक वाचा - २००६ अन् यंदाच्या बर्ड फ्ल्यूमध्ये फरक, चिकन अन् अंडी खाण्याबाबत पशूसंवर्धन मंत्र्यांचा महत्वाचा सल्ला

शाळाही सुरू झालेल्या नसल्याने अद्यापही अनेकांनी गावातील आपला मुक्काम नागपुरात हालविलेला नाही. त्यामुळे भाड्याच्या घरांची मागणी वाढली असली तरी अद्यापही पूर्वीसारखी गती आलेली नसल्याचे नंदू मिश्रा यांनी सांगितले. शहरात अंदाजे १० हजारच्या जवळपास नोंदणीकृत आणि नोंदणी नसलेले एजंट असल्याचीही माहिती पुढे आली आहे.

व्यवहार सुरळीत झाले नाहीत

मागील तीन महिन्यांत घरांच्या व्यवहारात वाढ झाली असली, तरी अद्यापही मागील वर्षांच्या तुलनेत व्यवहार कमीच आहेत. गेल्या वर्षी एप्रिल ते नोव्हेंबर ८० हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी भाड्याची घरे व आस्थापने घेतली होती. तर, यंदा ५० हजार नागरिकांनी व्यवहार केल्याची माहिती सूत्रांनी दिली. घरांच्या विक्रीत मागील काही महिन्यांत चांगली वाढ झाली आहे. मात्र, भाड्याच्या घरांचे व्यवहार अद्यापही अपेक्षेप्रमाणे सुरळीत झाले नाहीत, असे रिअल इस्टेट एजंटचे म्हणणे आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good days for the rented house in Nagpur