बनावट विक्रीपत्र तयार करून हडपले घर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जून 2020

लता हिने स्वत: घर रिकामे करण्याचे आश्वासन न्यायालयाला दिले होते. त्यानुसार दुसऱ्या दिवशी घर रिकामे केले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा घरात प्रवेश करून सामान भरले व आपण घराचे मालक असल्याचा दावा केला. यावेळी तिने 14 एप्रिल 2003 रोजी तयार केलेले बनावट विक्रीपत्र दाखवले.

नागपूर : भाडेकरूंनी बनावट विक्रीपत्र तयार करून घर हडपून घरमालकाची फसवणूक केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर घरमालकाने पोलिसांत तक्रार दिली. जरीपटका पोलिसांनी एका महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. लता ठाकूर आणि कुंवरसिंह ठाकूर दोन्ही, रा. बेझनबाग अशी आरोपींची नावे आहेत. 

मारोती गुलाब सूर्यवंशी (51) रा. नजूल ले-आउट असे फिर्यादीचे नाव आहे. त्यांचे भूखंड क्रमांक 386 वर स्वत:चे घर असून त्यातील अर्धा भाग 14 ऑगस्ट 2002 मध्ये आरोपी महिलेला भाड्याने दिला होता. कुंवरसिंह हा महिलेचा मुलगा आहे. अनेक वर्षे उलटूनही ते घर रिकामे करीत नव्हते. शिवाय त्यांनी भाडेही देणे बंद केले. या प्रकरणी न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. न्यायालयाने सर्व पक्षांची बाजू ऐकल्यानंतर 23 नोव्हेंबर 2019 ला निकाल सूर्यवंशी यांच्या बाजूने दिला. तसेच आरोपींना घर रिकामे करून थकीत भाडे घरमालकाला देण्याचे आदेश दिले. 

हेही वाचा : कशा ठरणार 'आशा' ग्रामीण भागाचा कणा?, वाचा काय झाला गैरप्रकार

त्यावेळी लता हिने स्वत: घर रिकामे करण्याचे आश्वासन न्यायालयाला दिले होते. त्यानुसार दुसऱ्या दिवशी घर रिकामे केले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा घरात प्रवेश करून सामान भरले व आपण घराचे मालक असल्याचा दावा केला. यावेळी तिने 14 एप्रिल 2003 रोजी तयार केलेले बनावट विक्रीपत्र दाखवले. सूर्यवंशी यांनी ते विक्रीपत्र बनावट असल्याचा दावा केला व आरोपींविरुद्ध तक्रार दिली. आरोपींनी त्यांच्यासह न्यायालयाची फसवणूक केल्याचा ठपका ठेवला. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी चौकशी करून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Grabbed house by making fake sales deed 

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: