ग्रामसेवक गावात राहत नाहीत, तुम्हीच सांगा विकास साधणार कसा?

संदीप गौरखेडे
Wednesday, 27 January 2021

जिल्हा परिषदेमार्फत राज्यशासनाच्या व केंद्रशासनाच्या कल्याणकारी योजना राबविल्या जातात. कल्याणकारी शासन म्हणून या सेवा ग्रामीण भागातील जनतेला सर्वकाळ उपलब्ध होतील, असे शासनाकडून पाहिले जाते.

कोदामेंढी (जि. नागपूर) : ग्रामसेवक हा गाव आणि सरपंच यामधील विकासात्मक दुवा समजला जातो. मौदा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये एकही ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसून नागपूर, भंडारा आणि मौदा अशा लांब पल्ल्याच्या ठिकाणाहून 'अपडाऊन' करतात. त्यामुळे गावविकासाला 'खीळ' बसेल हे सहजच आहे. बरेचशे ग्रामसेवक शंभर ते दीडशे किलोमीटरचा प्रवास करीत असतात. त्यामुळे तुम्हीच सांगा गावाचा विकास कसा साधणार? असा सवाल पुढे आला आहे. 

हेही वाचा - ‘आता ‘वाघ आला रे वाघ आला’ असं म्हटलं तरी विरोधकांची दाणादाण उडेल’

जिल्हा परिषदेमार्फत राज्यशासनाच्या व केंद्रशासनाच्या कल्याणकारी योजना राबविल्या जातात. कल्याणकारी शासन म्हणून या सेवा ग्रामीण भागातील जनतेला सर्वकाळ उपलब्ध होतील, असे शासनाकडून पाहिले जाते. यासाठी जिल्हा परिषदेमार्फत नियुक्त केल्या जाणाऱ्या ग्रामसेवकांना मुख्यालयी राहणे बंधनकारक केले आहे. मात्र, मुख्यालयी राहत असल्याचे खोटे दाखले सादर करीत असतात. गावपातळीवर ग्रामसेवकांना गावाचा सर्वांगीण विकासाच्या अनुषंगाने मुख्यालयी राहणे बंधनकारक असल्याचा ग्रामविकास विभागाने धोरणात्मक निर्णय देखील घेतला आहे. मात्र, सदर निर्णयाची पायमल्ली होताना दिसून येत आहे. याकडे वरिष्ठांचा असलेला दुर्लक्षपणा कारणीभूत असल्याचे एकंदरीत चित्र आहे. 

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांनी स्तुती केलेला ‘राजकुमार’ आहे तरी कोण? त्याचा उपवास होता म्हणून बरं झाल असं का...

मौदा पंचायत समितीअंतर्गत १२४ गावांचा समावेश असून ६३ ग्रामपंचायती आहेत. तारसा, खात, अरोली, कोदामेंढी, रेवराल, चाचेर, धानला, निमखेडा आदी मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविकास अधिकारी असणे अनिवार्य आहे. मात्र, खात ग्रामपंचायतला अद्याप ग्रामविकास अधिकारी मिळाला नसून कोदामेंढी येथे रुजू झालेले नाहीत. आठ ग्रामपंचायतीसाठी फक्त सहा ग्रामविकास अधिकारी सध्या कार्यरत आहेत. त्याचबरोबर बरेच ग्रामविकास अधिकारी आणि  ग्रामसेवक यांच्याकडे दोन ते तीन ग्रामपंचायतीचा डोलारा असल्याने एक ना धड भाराभर चिंध्या अशी वास्तविकता आहे. काही ग्रामसेवक तर ठेकेदार देखील बनलेत. गावातील विकास कामे करीत असताना स्वतःच बांधकामाचे  कंत्राट घेतात. मात्र, ते पडद्याआड आहेत. अनेक ग्रामपंचायतीचा डोलारा असल्याने स्वतंत्र दिन, प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन आदी दिवशी ध्वजारोहणाचा कार्यक्रमाला अनुपस्थिती असते. बरेचदा ग्रामसभा आणि मासिक सभेला देखील ग्रामसेवक हजर राहत नाही. गावातील कोणता वॉर्ड कुठे आहे? याची साधी माहिती देखील त्यांच्याकडे नसते. गावात कोणत्या समस्या आहेत, कोणती कामे करायची आहेत याची साधी कल्पना नसते कारण गावात कधी फिरकूनही पाहत नाहीत. गाव म्हटले की समस्यांचा जणू पाढाच असतो. या महिन्यात झालेल्या कोदामेंढीच्या मासिक सभेत चक्क ग्रामसेवक हजर नव्हते. असे प्रकार बऱ्याच ठिकाणी घडत असतात. काही ग्रामपंचायतीमध्ये महिना महिना ग्रामसेवकांचे तोंड पाहिले नसल्याचे गावकरी सांगतात. त्यातच सर्वच ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी 'अप डाऊन' करीत असतात. मुख्यालयी कुणीही राहत नसून अशी एकंदरीत विदारकता असल्याने आता तुम्हीच सांगा गावाचा विकास कसा साधणार? 

हेही वाचा -

शासन निर्णयानुसार ग्रामसेवकांनी मुख्यालयी राहणे गरजेचे आहे. कुणी ग्रामसेवक मासिक सभेला हजर राहत नसेल आणि कामचुकार करीत असल्यास तशी तक्रार सरपंचानी करावी. त्यावर कारवाई करता येईल. 
-दयाराम राठोड, खंडविकास अधिकारी पंचायत समिती मौदा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gramsevak not stay in duty village kodamendhi of nagpur