ती घरात नव्हे, माझ्या मनात नांदते!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 जानेवारी 2020

सून घरात नव्हे, मनात नांदते. माझी सून माझ्याच घरात राहावी, असा आग्रह माझा नाही. तिने आयुष्यभर मनात स्थान कायम ठेवावे, एवढीच अपेक्षा असल्याचे सांगत प्रभावती फडणवीस यांनी सासू-सुनेच्या या आगळ्यावेगळ्या नात्याबाबत सांगितले.

नागपूर : "मी आहे घर सांभाळायला. तू शिक्षण पूर्ण कर', असा धीर देत सुनेला उच्चशिक्षित करीत, सुनेचा आणि मुलाचा वेगळा संसार थाटून देणाऱ्या प्रभावती फडणवीस या नातेवाइकांच्या टीकेचा विषय ठरल्या. कुटुंबातील सुनेने केवळ चूल आणि मूल यापुरते मर्यादित राहू नये. सून घरात नव्हे, मनात नांदते. माझी सून माझ्याच घरात राहावी, असा आग्रह माझा नाही. तिने आयुष्यभर मनात स्थान कायम ठेवावे, एवढीच अपेक्षा असल्याचे सांगत प्रभावती फडणवीस यांनी सासू-सुनेच्या या आगळ्यावेगळ्या नात्याबाबत सांगितले.
लक्ष्मीनगर येथील डॉ. स्नेहल फडणवीस आणि प्रभावती फडणवीस या सासू-सुनेचे नाते समाजासमोर आदर्शवत ठरावे असे आहे. डॉ. स्नेहल यांच्या लग्नाला तीस वर्षे पूर्ण झालीत. मुलाचे लग्न झाले, तेव्हा तो नोकरीनिमित्त मुंबई राहायचा. सुनेचे शिक्षण नागपुरात सुरू होते. अशा वेळी प्रभावती यांनी पुढाकार घेत सुनेच्या शिक्षणाला महत्त्व दिले. "घरची जबाबदारी मी सांभाळते. तू शिक्षण पूर्ण कर', असे सांगत त्यांनी सुनेला एलएलबी, एलएलएम, नेटसह पीएच.डी.पर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्यात संपूर्ण सहकार्य आणि प्रोत्साहन दिले. उच्चशिक्षित झालेल्या सुनेला तिच्या शिक्षणाला साजेशी नोकरीही मिळाली.

सविस्तर वाचा - तुम्हाला चटपटीत खायला आवडते का? बस आलीच समजा खाऊगल्ली
डॉ. स्नेहल यांचे पती नागपूरला स्थायिक झाल्यानंतर त्यांनी मुलगा आणि सून यांना वेगळा संसार थाटायला सांगितले. आतापर्यंत तुमच्या सहकार्याला मी होतेच; पण आता तुमची जबाबदारी तुम्हीच घ्या, असे म्हणत प्रभावतीताईंनी जाणीवपूर्वक मुलगा व सुनेला वेगळे घर घेऊन स्वतंत्र राहण्यास सांगितले. शिकलेली सून नोकरीवर लागल्यावर तिला मुलासह वेगळे घर करून दिल्याने नातेवाइकांनी डोळे मोठे केले; परंतु आई ठाम होत्या. त्या सर्वांना सांगायच्या की, माझी सून घरात नव्हे, तर माझ्या मनात नांदते आहे. तिची प्रगती झाली तर मला त्यात आनंद आहे.
आई आता माझ्या दिरासोबत राहतात. मला केव्हाही त्यांची गरज भासली तर एका हाकेवर त्या माझ्या मदतीला धावून येतात. सासूने आईच व्हावे, असे अपेक्षित नाही. सासूने सासू बनूनही आपल्या जबाबदाऱ्या आनंदाने पार पाडल्या तर सुनेला तशी सासू आईपेक्षाही प्रिय होत असल्याचे डॉ. स्नेहल यांनी सांगितले.

शिस्तच महत्त्वाची
आईंनी मला कधीही आईच्या मायेने वागवले नाही. उलट, त्यांनी आपल्या शिस्तीत मला अधिक खंबीर बनविले. त्यांच्यामुळेच मी आज पीएच.डी.पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून प्राध्यापकपदाची जबाबदारी पार पाडत आहे.
डॉ. स्नेहल फडणवीस, सून

त्यांना संसारात रमू द्यावे
सुनेला आपल्याच जवळ ठेवावे, तिच्यावर हक्क गाजवावा, असे मला कधीही वाटले नाही. त्यांना त्यांच्या संसारात रमू द्यावे. आपली जिथे गरज पडेल, तिथेच आपण सहकार्य करणे अपेक्षित असते.
प्रभावती फडणवीस, सासू
 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: great bonding between monther in law & daughter in law