सावधान! आता ग्रामीण भागातही संकट होत आहे गहिरे 

corona
corona

कामठी (जि. नागपूर) : कोरोनाने आता ग्रामीण भागातही पाय पसरविणे सुरू केले आहे. मुंबई, पुणे तसेच बाहेरराज्यांतून आपल्या गावात परतणाऱ्यांमुळे कोरोनाचे संकट अधिक गडद होत आहे. यामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे. बाहेरून गावात येणाऱ्यांचे विलगीकरण करण्यात येत आहे. त्यांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. कामठी तालुक्‍यातील महादुला नगरपंचायत क्षेत्रात एका युवकाला कोरोनाची लागण झाल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. त्याचा तपासणी अहवाल शुक्रवारी (ता. 29) पॉझिटिव्ह आला. त्याच्या परिवारातील सात सदस्यांसह संपर्कात आलेल्या 31 जणांना नागपूरच्या वनामती या संस्थेत क्वारंटाइन करण्यात आले. 

रुग्ण राहत असलेला परिसर सील करून परिसर सॅनिटाइज करण्यात आला. तालुक्‍यातील हा सातवा पॉझिटिव्ह रुग्ण आहे. यातील दोन रुग्ण कोरोनावर मात करून घरी पोहोचले आहेत. कामठी तालुक्‍यातील महादुला येथे राहणारा 35 वर्षीय युवक हा वाहनचालक आहे. तो स्वतःच्या चारचाकी वाहनाने बिहार येथे मजूर सोडण्याकरिता गेला होता. तेथून 21 तारखेला गावी परत आल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटून लागले. नागपूरच्या मेयोत त्याचा स्वॅब न मुने तपासणी अहवाल आज पॉझिटिव्ह आला.

स्थानिक प्रशासनाला सूचना मिळताच तहसीलदार अरविंद हिंगे, महादुला नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संदीप छिद्रावार, कोराडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वजीर शेख व गुमथी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. राहुल राऊत आरोग्य पथकासह बाजार चौक परिसरात दाखल झाले. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या त्याच्या परिवारातील सात सदस्यांसह एकूण 31 जणांना नागपूरच्या वनामती संस्थेत क्वारंटाइन करण्यात आले. परिसर सॅनिटाइज करून काही भाग सील करण्यात आला. तालुक्‍यातील हा सातवा पॉझिटिव्ह रुग्ण आहे. यातील दोन रुग्ण कोरोनावर मात करून घरी पोहोचले आहेत. 

ट्रॅव्हल हिस्ट्री असलेल्यांची तपासणी 
कामठी : कामठी तालुक्‍यात आतापर्यंत सात लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली असून त्यापैकी सहा रुग्णांची ट्रॅव्हल हिस्ट्री असल्याचे लक्षात आल्याने मुंबई, पुण्यासह परराज्यातून आलेले नागरिक प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहेत. गुरुवार जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शहराला भेट देऊन बाहेरगावावरून तालुक्‍यात दाखल झालेल्यांची तपासणी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. प्रशासनाच्या वतीने शहरातील एमटीडीसी हॉलमध्ये बाहेरगावावरून आलेल्या नागरिकांकरिता विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात एकूण 112 जणांची सॉफ्ट तपासणी करून त्यांचे स्वॅब तपासणीचे नमुने नागपूरच्या प्रयोगशाळेमध्ये पाठविण्यात आले आहेत. 

201 जणांचे अहवाल निगेटिव्ह 
रामटेक : रामटेक तालुका, शहर व पारशिवनी तालुक्‍यातील पुणे, मुंबईवरून आलेले व विलगीकरणात असलेल्यांपैकी 201 जणांचा स्वॅब तपासणी अहवाल निगेटिव्ह आला असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चेतन नाईकवार यांनी सांगितले. यात रामटेक तालुक्‍यातील 132 तर पारशिवनी तालुक्‍यातील 69 जणांचा समावेश आहे. तालुक्‍याच्या करवाही, हिवराबाजार, भंडारबोडी प्राथमिक आरोग्य केंद्रांसह रामटेक शहरातील काही जणांचे स्वॅब घेण्यासाठी पुढील आठवड्यात नागपूरवरून पथक येऊ शकते. 

हिंगण्यातील वृद्ध कोरोनाग्रस्त 
एमआयडीसी परिसरातील लोकमान्य नगरातील 60 वर्षीय व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती आहे. एमआयडीसी पोलिस व हिंगणा तहसीलदार त्या परिसरात पोहोचले असून, हा परिसर सील करण्याची कारवाई लवकरच सुरू होऊ शकते. सदर व्यक्ती ही खानदेश (मराठवाडा) येथून काही दिवसांपूर्वी लोकमान्य नगर येथे त्यांच्या मुलाकडे आली होती. त्यांना क्वारंटाइन सेंटरवर ठेवण्यात आले होते. त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com