आठ महिन्यानंतर होणार खेळांचा गजर; खेळाडू, प्रशिक्षक आणि पदाधिकारी खुश

नरेंद्र चोरे 
Friday, 6 November 2020

राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वी नवे मार्गदर्शक तत्त्वे घोषित करताना 'सोशल डिस्टंसिंग'च्या अटींवर इनडोअर गेम्स, जलतरण, योगा इत्यादी खेळांना हिरवी झेंडी प्रदान केली. 

नागपूर : उपराजधानीतील क्रीडांगणावर आता पुन्हा पूर्वीसारखी गर्दी उसळणार आहे. राज्य सरकारने नुकतीच खेळांना परवानगी दिल्यामुळे हळूहळू 'स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज' सुरू होणार आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे खेळाडूंसह प्रशिक्षक व क्रीडा पदाधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचा - प्रवासादरम्यान नेहमी मळमळ आणि उल्टीचा त्रास होतो? घाबरू नका पुढील उपाय नक्की करून बघा

राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वी नवे मार्गदर्शक तत्त्वे घोषित करताना 'सोशल डिस्टंसिंग'च्या अटींवर इनडोअर गेम्स, जलतरण, योगा इत्यादी खेळांना हिरवी झेंडी प्रदान केली. त्यामुळे शहरात पाच नोव्हेंबरपासून बॅडमिंटन, नेमबाजीसह जलतरण व योगाच्या सरावाला सुरुवात अपेक्षित होती. मात्र बहुतांश इनडोअर हॉलचे सॅनिटायझेशन व स्वच्छता न झाल्यामुळे सोमवारपासून औपचारिक सरावाला आरंभ होणार आहे. 

शासनाने उशिरा का होईना खेळांना परवानगी दिल्यामुळे खेळाडू, प्रशिक्षक व क्रीडा संघटनांचे पदाधिकारी खूश आहेत. लॉकडाउनचा सर्वाधिक फटका प्रशिक्षकांना बसला. कोरोनाने उदरनिर्वाहाचे साधन हिरावून घेतल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. क्रीडा स्पर्धांना ब्रेक लागल्याने खेळाडूंसह पदाधिकारीही निराश होते.

हेही वाचा - गर्भवती महिला पतीसोबत दुचाकीने जात होती रुग्णालयात; मात्र टिप्परच्या धडकेत झाला मृत्यू

खेळ पूर्ववत सुरू व्हावेत यासाठी नागपूर जिल्हा बॅडमिंटन संघटनेसह अनेकांनी मनपा आयुक्तांपासून क्रीडा मंत्र्यांपर्यंत वारंवार निवेदने देऊन त्यांना साकडे घातले. दैनिक 'सकाळ'नेही वेळोवेळी बातम्या प्रकाशित करून त्यांच्या अडचणी शासनाच्या कानावर घातल्या. अखेर सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांना यश आले आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: grounds will open for players after 8 months