...आता रेल्वेतही गुंडाराज

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 जानेवारी 2020

प्रवासादरम्यान रविवारी रात्री अतुल जेवण करण्यासाठी मंगेशजवळ गेला. जेवण आटोपून दोघेही बी-3 डब्याकडे जाण्यास निघाले. बी-2 डब्यातून जात असताना जवानाचा धक्का एका तरुणीला लागला. यावरून काही वेळ शाब्दिक वाद झाला. सोमवारी दुपारी एक तरुणी वॉशरूमला गेली. त्याचवेळी लष्करी जवानांनी छेड काढल्याचा तिचा आरोप आहे.

नागपूर : रेल्वेप्रवासादरम्यान तरुणीची छेड काढल्याच्या आरोपावरून लष्करी जवानांना मारहाण करण्यात आली. त्यांचे सामान मोबाईलही धावत्या गाडीतून फेकून देण्यात आले. ही घटना कर्मभूमी एक्‍स्प्रेसमध्ये घडली. या प्रकरणी दोन्ही पक्षांच्या तक्रारीवरून परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हे वाचाच - शिरी-फरहाद, हिर-रांझा, सलीम-अनारकली आणि...

प्राप्त माहितीनुसार, ठाण्यातील तरुण-तरुणी आसामला पर्यटनासाठी गेले होते. 22512 कामाख्य कर्मभूमी एक्‍स्प्रेसमच्या बी-2 डब्यातून परतिचा प्रवस सुरू होता. याच गाडीतून सशस्त्र सीमा दलाचे जवान मंगेश चौके (रा. चिमूर) आणि अतुल मोहिते (रा. भुसावळ) सुट्या मिळाल्याने आसामहून घरी जात होते. मंगेश एस-7 डब्यातील 47 क्रमांकाच्या बर्थवर तर अतुल बी-3 डब्यात बर्थ 21 वरून प्रवास करीत होते. प्रवासादरम्यान रविवारी रात्री अतुल जेवण करण्यासाठी मंगेशजवळ गेला. जेवण आटोपून दोघेही बी-3 डब्याकडे जाण्यास निघाले. बी-2 डब्यातून जात असताना जवानाचा धक्का एका तरुणीला लागला. यावरून काही वेळ शाब्दिक वाद झाला. सोमवारी दुपारी एक तरुणी वॉशरूमला गेली. त्याचवेळी लष्करी जवानांनी छेड काढल्याचा तिचा आरोप आहे. तरुणीने आरडाओरड करताच तिचे सात मित्र धावून आले. त्यांनी लष्करी जवानांना मारहाण केली. त्यांचे सामान, मोबाईल धावत्या रेल्वेतून बाहेर फेकले. दोघांनाही त्याच डब्यातच बसून ठेवले. नागपूर ओलांडल्यानंतर वर्धा ते पुलगावदरम्यान गाडी थांबली असता, दोघेही उतरले आणि महाराष्ट्र एक्‍स्प्रेसने वर्धा स्थानकावर गेले. लोहमार्ग पोलिस ठाणे गाठून त्यांनी मारहाण करणाऱ्यांविरुद्ध तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार एका तरुणाला धक्का लागल्यावरून हे भांडण झाले होते. लोहमार्ग पोलिसांनी सात प्रवाशांविरुद्ध मारहाण, जीवे मारण्याची धमकी, सामान फेकण्याचा गुन्हा नोंदविला. लागलीच लोहमार्ग पोलिसांचे पथक आरोपींना ताब्यात घेण्यासाठी रवाना झाले. भुसावळला गाडी थांबली असता, पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले आणि वर्धा स्थानकावर आणले. त्यांच्यापैकी एका तरुणीने दोन्ही लष्करी जवानांनी छेड काढल्याची तक्रार दिली. पीडितेच्या तक्रारीवरून लोहमार्ग पोलिसांनी लष्करी जवानांविरुद्ध गुन्हा नोंदविला.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ... Gundaraj now on the train