शिरी-फरहाद, हिर-रांझा, सलीम-अनारकली आणि...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 जानेवारी 2020

सुपरमध्ये प्रथमच किडनी प्रत्यारोपणातून शेतकरी पतीने पत्नीचा जीव वाचवला. तीन मुलींवर पुन्हा आईच्या मायेची सावली शाबूत ठेवण्याचे काम वडिलांनी केले. आतापर्यंत सुपर स्पेशालिटीत 60 किडनी प्रत्यारोपणातून 60 जणांचा जीव वाचविण्यात सुपरच्या किडनी विभागाला यश आले.

नागपूर : आतापर्यंत पत्नीने पतीला, मुलीने आईला, सासूने सुनेला किडनी दान करून जीवदान दिले. परंतु सुपरमध्ये प्रथमच किडनी प्रत्यारोपणातून शेतकरी पतीने पत्नीचा जीव वाचवला. तीन मुलींवर पुन्हा आईच्या मायेची सावली शाबूत ठेवण्याचे काम वडिलांनी केले. आतापर्यंत सुपर स्पेशालिटीत 60 किडनी प्रत्यारोपणातून 60 जणांचा जीव वाचविण्यात सुपरच्या किडनी विभागाला यश आले.
किडनी दान करणाऱ्या पतीचे नाव राजेश जिभकाटे (47 वर्षे) आहे. ते भंडारा जिल्ह्यातील पवनी येथील रहिवासी आहेत. राजेश यांच्या पत्नी लक्ष्मी (44) यांना गेल्या काही महिन्यांपासून किडनीचा त्रास होता. त्यांच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या. जून 2019 पासून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या किडनीरोग विभागात उपचार सुरू होते. डायलिसिसवरचे आयुष्य किती दिवस जगायचं असा विचार करीत पती राजेशने पुढाकार घेतला. राजेशच्या रक्तगटासह इतरही गोष्टी जुळून आल्या. सहा जानेवारीला किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली.

सविस्तर वाचा - मजनुगिरी करणाऱ्या पोलीसाचीच धुलाई

 

मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे विशेष कार्यअधिकारी डॉ. मिलिंद फुलपाटील यांच्या मार्गदर्शनात मूत्रपिंड प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. संजय कोलते, मूत्रपिंड तज्ज्ञ डॉ. समीर चौबे, नेफ्रोलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. चारुलता बावनकुळे, यूरोलॉजी विभागप्रमुख डॉ. धनंजय सेलुकर, डॉ. कुणाल मेश्राम, डॉ. प्रतीक लढ्ढा, डॉ. रितेश बनोदे, डॉ. पीयूष किंमतकर, डॉ. वंदना आदमने व डॉ. मेहराज शेख यांनी यशस्वी केली.
 
मुलींच्या डोळ्यांत आनंदाश्रू
लक्ष्मी यांच्यासाठी नव्हेतर तर राजेश यांच्या तीन मुलींसाठी हे किडनी प्रत्यारोपण महत्त्वाचे ठरले. वडील राजेश यांनी पत्नी लक्ष्मीला किडनीदान केले. या किडनीदानातून तीन मुलींच्या आईला जीवनदान मिळाले. हे किडनीदान यशस्वी झाल्यानंतर या तिन्ही मुलींचे डोळे डबडबले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू बाहेर आले खरे, परंतु चेहऱ्यावर हास्य फुलले  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: husband donated his kideny to wife