बोर्ड लावला ना भौ, "वन्ली कटिंग.................वाचा काय आहे झांगडगुत्ता

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

मनपा आयुक्तांनी तयार केलेल्या नियमावलीत डिस्पोजल टॉवेलचा वापर बंधनकारक करण्यात आला. पण, हा टॉवेलसंदर्भात कुणालाही माहिती नसल्याने, सलून व्यावसायिकांची शनिवारी शोधाशोध सुरू होती. शिवाय ऍप्रनसाठी पैशाची जुळवाजुळव करण्यातही सलून चालकांचा वेळ गेला. ऍप्रन सहाशे ते आठशे रूपयांत चालकांनी विकत घेतले तर डिस्पोजल टॉवेलची किंमत प्रत्येक ग्राहकामागे पंधरा रूपये इतकी आहे.  

नागपूर : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत तब्बल तीन महिन्यानंतर सलूनचालकांनी आज सकाळी दुकानांचे शटर उघडले. डोक्‍यावरील वाकडे तिकडे, विस्कटलेले केस "स्टाइलीश' कापून देत कारागिरांनी पहिल्या दिवसाच्या कामाचा श्रीगणेशा केला. कुठे थर्मल स्कॅनिंगने तपासणी तर कुठे सॅनिटायझरचा स्पे मारून ग्राहकांना सलूनमध्ये प्रवेश देण्यात येत होता. शासनाच्या "कात्री'त अडकू नये म्हणून निम्म्याहून अधिक सलूनबाहेर "ओन्ली कटिंग'चा फलकही झळकत होते. 

शासनाचे नियम व अटींचे तंतोतंत पालन करीत सलून चालकांनी व्यवसायास प्रारंभ केला. सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे यासाठी अनेकठिकाणी बसण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यातच तब्बल तीन महिन्यानंतर सलून सुरू झाल्याने कटिंग करण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली. एकंदरीत कोरोनाचा संसर्ग वाढू नये याची काळजी घेत असल्याचे सलून चालकांच्या व्यवस्थेवरुन दिसून येत होते. काही सलून चालनांनी कटिंगचे दर वाढविल्याचे देखील चित्र होते. 

धक्‍कादायक... कोरोनाबाधित रुग्णाच्या जेवणात आढळल्या अळ्या

सलूनमधील शस्त्रांचे व कंगव्याचे निर्जंतुकीकरण केल्याशिवाय चालक उपयोग करीत नव्हते. अनेक सलूनमध्ये तर कर्मचारी तोंडाला मास्क, ऍप्रन आणि हातात ग्लोव्हज घालून ग्राहकांची कटिंग करताना दिसले. शिवाय प्रत्येक ग्राहकाच्या शरीरातील तापमान थर्मल स्कॅनिंगने तपासूनच आत प्रवेश दिला गेला. आकाराने छोटे असलेल्या सलून चालकांनी ग्राहकांना बाहेरच थांबविण्याचा देखील निर्णय घेतला. तसेच दूरध्वनीवरून संपर्क साधणाऱ्या ग्राहकांना तर ठरावीक वेळेत दुकानात बोलावले गेले. त्वचेशी संबंधित विकार, सर्दी, ताप, खोकला असेल कटिंग न करण्याचा निर्णय काही सलून चालकांनी घेतला. 

कटिंससोबत दाढी आणि मसाज करण्याची परवानगी दिली असती तर सलून व्यवसायिकांच्या मिळकतीमध्ये वाढ झाली असती. नुकसान भरपाई होण्यास त्याचा मोठा फायदा झाला असता. तरीही शासनाने या मागणीकडे लक्ष द्यावे व नाभिकांच्या जीवनातील आर्थिक संकट टाळावे. 
सतीश तलवारकर, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नाभिक महामंडळ. 

मनपा आयुक्तांनी तयार केलेल्या नियमावलीत डिस्पोजल टॉवेलचा वापर बंधनकारक करण्यात आला. पण, हा टॉवेलसंदर्भात कुणालाही माहिती नसल्याने, सलून व्यावसायिकांची शनिवारी शोधाशोध सुरू होती. शिवाय ऍप्रनसाठी पैशाची जुळवाजुळव करण्यातही सलून चालकांचा वेळ गेला. ऍप्रन सहाशे ते आठशे रूपयांत चालकांनी विकत घेतले तर डिस्पोजल टॉवेलची किंमत प्रत्येक ग्राहकामागे पंधरा रूपये इतकी आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hair salons reopen in maharashtra