कोरोनाच्या भीतीपोटी 'यूपीएससी' परीक्षेला निम्मेच विद्यार्थी हजर, संधी वाया गेल्याची खंत

मंगेश गोमासे
Monday, 5 October 2020

केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा ४ ऑक्टोबरला घेण्यात आली. मात्र, कोरोना संक्रमणाच्या भीतीने अर्ध्यापेक्षा अधिक विद्यार्थी या परीक्षेला गैरहजर होते. फक्त कोरोनामुळे एक संधी वाया गेल्याची खंत देखील विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केली. 

नागपूर : कोरोना संक्रमणाच्या भीतीपोटी नागपूर केंद्रावरील १७ हजार ७०१ नोंदणीकृत विद्यार्थ्यांपैकी ८ हजार २०९ विद्यार्थ्यांनीच केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा दिली. कोरोनाची भीती, वाहन आणि निवासाच्या समस्यांमुळे अर्ध्याहून अधिक विद्यार्थी परीक्षेला मुकले.

हेही वाचा - ऑनलाइन शिक्षण देताना भेदभाव नको, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विद्यापीठांना सूचना

काल ४ ऑक्टोबर केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा होती. नागपुरातील ४५ केंद्रांवर सकाळी साडेनऊ ते साडेअकरा व दुपारी अडीच ते साडेचार यादरम्यान परीक्षा घेण्यात आली. विदर्भासाठी नागपूर हे परीक्षेचे एकमेव केंद्र असल्याने येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती. निवासगृहे, वसतिगृहे बंद आहेत. त्यामुळे एक दिवसाआधी येऊन देखील कुठलाच फायदा नव्हता. त्यामुळे अनेकांनी दिवसावर येणे पसंत केले. त्यातही रेल्वे आणि बसेसची सोय असली तरी कोरोनाच्या भीतीने अनेक विद्यार्थ्यांनी खासगी वाहनाने येणे पसंत केले होते. कोरोनामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही. त्यामुळे एक संधी गेल्याची खंत विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा - सकाळ IMPACT : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची दयनीय अवस्था होणार दूर, ९ एक्स-रे तंत्रज्ञांची तत्काळ...

परीक्षा केंद्रावर जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खबरदारी घेण्यात आली होती. विशेष म्हणजे रेल्वेस्थानक ते परीक्षा केंद्रापर्यंत जिल्हा प्रशासनाच्या वतीने ७० बसेसची व्यवस्थाही करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना मास्क आणि सॅनिटायझर स्वत:जवळ ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच केंद्रावर आवश्यकता असल्यास सुरक्षा साहित्य पुरवण्यात आले. याशिवाय शारीरिक अंतर पाळून विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था पाळण्यात आली होती. कोरोना संक्रमणाचा धोका असतानाही सर्व सुरक्षा व्यवस्था पाळत परीक्षा घेण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांनीही समाधान व्यक्त केले. मात्र, कोरोनाकाळात परीक्षा घेऊ नका, अशी मागणी असतानाही आयोगाने परीक्षा घेतल्याने अनेकांना ती देता आली नसल्याची खंत विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

संपादन - भाग्यश्री राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: half of the student did not give upsc exam due to corona in nagpur