
नागपूर : कोरोनाशी युद्ध छेडल्यानंतर जवळपास अडीच महिने लॉकडाउन होते. शासनाने टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल केले. मात्र, कोरोनाचे संकट टळले असे वाटावे अशी गर्दी रस्त्यांवर होऊ लागली आहे. तीन महिन्यांच्या कालावधीनंतर सवलत मिळाल्यानंतर शहरात एकाच दिवशी 86 रुग्ण आढळले. लगेच दुसऱ्या दिवशी 57 बाधित आढलले. मोकळीक जीवघेणी ठरत असेल तर पुन्हा पंधरा दिवसांचा कठोर लॉकडाउनची घोषित होण्याची टांगती तलवार शहरावर आहे.
राज्यातील बाधितांचा आकडा लाखाच्या आहे. मात्र, अद्याप सामुदायिक संसर्ग नाही, ही राज्याची जमेची बाजू आहे. परंतु, दाट लोकवस्त्यांमध्ये तसेच बाजारपेठा आणि रस्त्यांवर वाहनांची गर्दी दिसू लागली आहे. राज्य शासनाने विस्कळीत झालेल्या जीवनचक्राची गती नियमित करण्यासाठी "अर्थचक्र' सुरू होईल या हेतूने टप्प्याटप्प्याने मोकळीक दिली. नागपुरात नाईक तलाव-बांगला देश या दाटीवाटीच्या वस्तीत "पार्टी' रंगली. या पार्टीवरून पोलिस आणि महापालिका प्रशासन आमने सामने आले. यात वादाला तोंड फुटले. प्रशासनातील हा वाद जनतेसाठी धोक्याचा ठरत आहे.
शहरात 30 एप्रिलला अवघे 139 कोरोनाबाधित होते. मागील चाळीस दिवसात 733 रुग्ण वाढल्यामुळे धोक्याची घंटा वाजली आहे. याची जाणीव नागरिकांनी ठेवणेही आवश्यक आहे. थोडी ढिल दिल्यानंतर रस्त्यावरील बाजार फुलले, हॉटेलमध्ये पार्सल सुविधा वाढल्या, यातून सर्वत्र गर्दी वाढत चालली आहे. नागरिकांनी दुर्लक्ष केले तर पुन्हा एकदा लॉकडाउनची होण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.
सवलत मिळाली असली तरीही नागपूरकरांनी सावध होण्याची आवश्यकता आहे. लॉकडाउन टप्प्याटप्प्याने कमी होत आहे, याची जाणीव ठेवणे गरजेचे आहे. शहरात साडेचारशे झोपडपट्ट्या आहेत. यामुळे दाट वस्त्यांची ही संख्या नागपूरसाठी जोखमीची आहे. कडक लॉकडाउन असताना बाधितांची संख्या वाढली. आता सवलतीमध्ये कोरोनाचा ब्लास्ट होत असेल तर नागपूरकरांच्या वाट्याला दुसरे लॉकडाउन येणार, असे बोलले जात आहे.
वाढती रुग्णसंख्या धोक्याची
कोविड- 19 चे संकट ही एक युद्धजन्य स्थिती आहे. आतापर्यंत लढून कोरोनाच्या मृत्यूवर नियंत्रण राखले आहे. मात्र, रुग्णांची वाढती संख्या धोक्याची आहे. शहरात दमा, मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब, क्षयाचे हजारो रुग्ण आहेत. त्यांच्यासाठी तरी या शिथिल वातावरणाचा गैरफायदा घेऊ नका.
-डॉ. अविनाश गावंडे, वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल, नागपूर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.