आज ‘सुपर संडे’; दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत चैतन्य, विक्रेत्यांची सवलतींची खैरात

राजेश रामपूरकर
Sunday, 8 November 2020

शासकीय कर्मचाऱ्यांना बोनस मिळालेला आहे. तसेच कोरोनाच्या काळात घराच्या बाहेर न पडलेला ग्राहक आता बाजारात खरेदीसाठी सुरक्षेचे पालन करून निघाला आहे. बाजारात ग्राहकांच्या तोंडावर मास्क दिसत आहे. अनेक दुकानदारांनी मास्क नसेल तर ग्राहकांना मास्क देण्याची सोय केली आहे.

नागपूर : आठ दिवसांवर दिवाळी येऊन ठेपल्याने बाजारात नागरिकांची गर्दी वाढत आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विक्रेत्यांनी सवलतींची खैरात चालवली आहे. खऱ्या अर्थाने रविवारी (ता. ८) खरेदीचा सुपर संडे ठरणार असल्याचे चित्र आहे.

कोरोनामुळे बाजारात चैतन्य गायब झाले आहे. तरी गरजेनुसार ग्राहक खरेदीसाठी बाजारात येतील. त्यामुळे दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ पूर्णपणे सजली आहे. ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे. शहरातील मुख्य रस्त्यांबरोबर इतर महत्त्वाच्या ठिकाणी कपडे, आकाशकंदील, फटाके, पणती, रांगोळी, सुगंधी तेल आदींचे स्टॉल मोठ्या प्रमाणात उभारले आहेत. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे.

अधिक वाचा - शेतातील पडक्या खोलीतून येत होती दुर्गंधी; मित्राच्या सांगण्यावरून जाऊन बघितले असता आढळला महिलेचा कुजलेला मृतदेह

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात दिवाळी आल्याने गृहिणींना फराळ तयार करण्यासाठी वेळ कमी मिळाला आहे. त्यामुळे यंदा रेडिमेड फराळावर ताव मारणाऱ्यांसाठी गृहउद्योग फराळाच्या तयारीला वेग आला आहे. या व्यवसायात अनेक बचत गट सहभागी झालेले आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महिला सुरक्षेच्या दृष्टीने घरीच फराळ तयार करणार असल्याने या बचत गटांची उलाढाल मंदावण्याची शक्यता आहे.

कोरोनाच्या काळात घराच्या बाहेर न पडलेला ग्राहक आता बाजारात खरेदीसाठी सुरक्षेचे पालन करून निघाला आहे. बाजारात ग्राहकांच्या तोंडावर मास्क दिसत आहे. अनेक दुकानदारांनी मास्क नसेल तर ग्राहकांना मास्क देण्याची सोय केली आहे. इतवारी, महाल, सक्करदरा, धरमपेठ, गांधी बाग, सदर, गोलबाजार, कडबी चौक आदी परिसरात ग्राहकांची खरेदीसाठी वर्दळ वाढली आहे असे कॅटचे अध्यक्ष बी. सी. भरतीया यांनी सांगितले.

अधिक माहितीसाठी - हायवेने प्रवास करीत असाल तर दंडाचे पाचशे रुपये जवळ ठेवा!

स्थानिक बाजारातून खरेदी करा
दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांनी स्थानिक बाजारातून खरेदी करावी अशी मोहीम नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने आखली आहे. त्यामुळे ऑनलाईन बाजारापेक्षा ग्राहक स्थानिक बाजारातून खरेदी करण्यास तयार होतील.
- अश्विन मेहाडिया, अध्यक्ष

बाजारपेठ सजली

मोठी खरेदी आणि विविध प्रकारचे गोडधोड आणि आनंद द्विगुणीत करणारा सण म्हणजे दीपावली. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते. खरेदीसाठी संपूर्ण बाजारपेठ सजली आहे. विविध प्रकारचे तयार कपडे, बालगोपालांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस, विविध प्रकारचे सजावटीचे साहित्य, अत्तर, फटाके, आकाशकंदील, पूजेचे साहित्य, विविध रंगांच्या रांगोळ्या आदी विविध प्रकारचे स्टॉल उभारण्यात आले आहे. रात्रीच्या वेळी मुख्य रस्त्यांवर गर्दी वाढत आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: happiness in the market for Diwali shopping