Happy New Year: मंदिरे आणि बगीचे 'हाऊसफुल्ल'; नागपूरकरांची तुफान गर्दी; कोरोनाची भीती न बाळगता 'एन्जॉयमेंट'

नरेंद्र चोरे 
Friday, 1 January 2021

नागपुरात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी देवदर्शन व सहपरिवार 'एन्जॉय' करण्याची परंपरा आहे. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे धार्मिक स्थळी गर्दी पाहायला मिळाली. सर्वाधिक गर्दी नागपूरकरांचे दैवत असलेल्या टेकडीचा गणपती व साई मंदिरात दिसून आली

नागपूर : रात्रीची संचारबंदी आणि ड्रंक ॲन ड्राइव्ह कारवाईच्या भीतीपोटी 'थर्टी फर्स्ट'च्या रात्री घरांत बसून राहिलेल्या नागपूरकरांनी नववर्ष उजडताच मंदिरे व बगिच्यांमध्ये तुफान गर्दी केली. नागरिकांनी कोरोनाची चिंता न करता मनसोक्त 'एन्जॉय' करत पहिला दिवस परिवारासोबत घालविला.

नागपुरात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी देवदर्शन व सहपरिवार 'एन्जॉय' करण्याची परंपरा आहे. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे धार्मिक स्थळी गर्दी पाहायला मिळाली. सर्वाधिक गर्दी नागपूरकरांचे दैवत असलेल्या टेकडीचा गणपती व साई मंदिरात दिसून आली. येथे दर्शनासाठी सकाळपासूनच भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. भक्तांनीही मास्क घालून 'सोशल डिस्टन्स' पाळत शांततेत दर्शन घेतले.

नक्की वाचा -'त्यांच्या' गाडीचा हॉर्न ऐकताच महामार्गावर जमतात असंख्य कावळे; याला दातृत्व म्हणावं की मैत्री

'कोरोनाचे संकट लवकर जाऊ दे' अशी विनवणी करताना दिसून आले. यावेळी दोन्ही मंदिरांमध्ये कडेकोट पोलिस बंदोबस्त होता. ठिकठिकाणी प्रसाद वितरणही झाले. शहरातील गुरुद्वारा व चर्चमध्येही गर्दी पाहायला मिळाली. मंदिरांसोबतच बगिच्यांमध्येही नागपूरकरांनी तुफान गर्दी केली. कोरोनाचीही त्यांनी चिंता केली नाही.

'न्यू ईयर' थाटात

महाराजबाग, अंबाझरी, रामन विज्ञान केंद्रासह शहरातील सर्वच छोट्यामोठ्या बगिच्यांमध्ये अलोट गर्दी पाहायला मिळाली. महाराजबागमध्ये बच्चे कंपनीने आकर्षण अर्थातच खेळणी व प्राणीसंग्रहालय होते. वाघोबा, माकड, हरीण व मगर पाहण्यासाठी मुले मायबापाकडे हट्ट करताना दिसून आले. त्यामुळे आईबाबांनाही त्यांचा हट्ट पुरवावा लागला. खेळणीच्या ठिकाणीही बच्चे कंपनीचाच माहोल होता. कोरोना आल्यापासून नागपूरकर घराबाहेरच पडले नव्हते. नववर्षाच्या निमित्ताने का होईना अनेकांनी कुटुंबियांसह मौजमजा करत 'न्यू ईयर' थाटात साजरे केले.

अधिक माहितीसाठी - ‘माझ्यावर जबाबदारी आहे; परंतु, माझा नाइलाज आहे’ अशी चिठ्ठी लिहून बिल्डरची आत्महत्या

मंदिरांमध्येही 'सेल्फी'

हाती स्मार्टफोन आल्यापासून 'सेल्फी'चे जणू फॅडच आले आहे. याचा आजही प्रत्यय आला. बगिच्यांमध्येच नव्हे, मंदिरांमध्येही अनेक जण 'सेल्फी' घेताना दिसून आले. फुटाळावर मात्र नूतनीकरणाचे काम सुरू असल्यामुळे शुकशुकाट जाणवला.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Happy New Year temples and gardens are full on first day of Year 2021