आरोग्यमंत्री महोदय, नाही बेड; नाही खासगीत उपचाराची क्षमता, आता तुम्हीच बघा...

wadi
wadi

वाडी (जि.नागपूर) : खासगीचा उपचार खर्च सर्वसामान्यांच्या क्षमतेच्या बाहेर आहे. वाडी परिसरात आतापर्यंत बाधितांची संख्या ७०० च्या जवळपास पोहोचल्याने व मृतांची संख्या मागील आठवड्यात २४ च्या जागी आता ३० वर गेल्याने चिंतेचे वातावरण निर्माण होणे स्वाभाविक आहे. वाडी परिसरातील काही रुग्णांना नागपूर येथील रुग्णालयात ऑक्सिजन बेड उपलब्ध न झाल्याने व ५-५ तास त्यांना भटकंती करावी लागत असल्याने मृत्यूच्या संख्येत वाढ होत असल्याच्या वृत्ताने नागरिकांत तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. अशात आरोग्यमंत्री महोदयांनी वाडीचा प्रश्‍न त्वरित सोडवावा, अशी वाडीवासींची अपेक्षा आहे.

कोरोना उपचार केंद्र निर्मितीची आवश्यकता
 वाडी परिसरात एक आकस्मिक कोरोना उपचार केंद्र निर्मितीची आवश्यकता भासू लागली आहे. नागरिकांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून रोष व्यक्त करीत सर्व राजकीय पक्षाचे प्रमुख पदाधिकारी एका मंचावर येऊन उचित कार्यवाहीसाठी कृती समिती स्थापन करण्यात आली. या समितीने नागपूर ग्रामीणचे तहसीलदार मोहन टिकले, मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांच्या सहकार्याने वाडीत व्हेंटिलेटरयुक्त अस्थाई स्वरूपात ५० बेडचे रुग्णालय सुरू करण्याचा प्रस्ताव नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविला आणि वाडीमध्ये प्रस्तावित १०० बेडच्या रुग्णालयाचा पेंडींग प्रस्ताव मंत्रालयात तातडीने मंजुरीसाठी निवेदन व नगर परिषदेचा प्रस्ताव राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कृती समितीद्वारा दिला.

अधिक वाचाः सोने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय, भावात मोठी घसरण

आतापर्यंत ३० बळी
वाडी नगर परिषद क्षेत्रात वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येने प्रशासनासह नागरिक, राजकीय, सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांत चिंतेचा विषय निर्माण झाला आहे.  नगर परिषदेचा आरोग्य विभाग, मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन हेमके, आरोग्य निरीक्षक धनंजय गोतमारे, आरोग्य अधिकारी डॉ.सोनाली बाके, डॉ. सुषमा धुर्वे यांच्या मार्गदर्शनात निरंतर प्रयत्नशील आहेत. परंतू  वाडीत आतापर्यंत व्याहाड आरोग्य केंद्राच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेत कोरोना स्वॅब केंद्रावर ४९३९ रुग्णांची तपासणी करण्यात आली. ज्यामध्ये आतापर्यंत ६८८ च्या जवळपास कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले. या रुग्णांपैकी २१७ रुग्ण ॲक्टिव असल्याचे सांगितले व आतापर्यंत ३० कोरोना रुग्णांचे विविध ठिकाणी निधन झाले.

८० टक्के बाधित रुग्ण घरीच विलगीकरणात
८० टक्के बाधित रुग्ण घरीच विलगीकरणात असून आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनानुसार उपचार घेत आहेत. मोठ्या संख्येने रुग्ण बरेही होत असून बाधित नागरिकांना घरीच सील करण्यात येत असून १२८ घरांना  सुरक्षित करण्यात आले आहे. वर्तमानात ३२ बाधित रुग्ण शासकीय व इतर विविध रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती नगर परिषदेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नगरपरिषद  व संयुक्त कृती समितीद्वारा ५० बेडचे व्हेंटिलेटर युक्त कोरोना उपचार केंद्राचा प्रस्ताव तातडीने मान्य होण्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.  नगरपरिषद आणि कृती समिती गंभीरतेने वरिष्ठांशी संपर्कात राहून क्रियाशील राहण्याचे मत नागरिकांनी चर्चेदरम्यान व्यक्त केले.

संपादनः विजयकुमार राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com