गर्भवती महिलांनो, घाबरू नका... वाचा कोरोनोसंदर्भातील ही माहिती

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 28 March 2020

गर्भवती महिलेला मधुमेह किंवा अस्थमाचा आजार असेल तर हा धोका अधिक प्रमाणात वाढतो. त्यामुळे सामान्य माणसांप्रमाणेच काळजी घ्यावी. पण गर्भवती असल्याने इतरांशी कमीतकमी संपर्क येईल, असे प्रयत्न करावे. बाळाच्या हालचालीकडे लक्ष ठेवा आणि रक्तस्त्राव, पाणी जाणे, पोटात दुखणे (लेबर पेन) आदी आकस्मिक गरज वाटल्यास त्वरीत डॉक्टरांना भेटा आदी सूचना त्यांनी दिल्या आहेत.

नागपूर :  कोरोना विषाणूचा धोका गर्भवतीला अधिक असल्याने सध्या किरकोळ कारणांवरूनही घाबरून जात गर्भवती महिला दवाखान्यात धाव घेत आहेत. परंतु, गर्भवती कोरोनाबाधित झाली तरी तिच्या पोटातील बाळापर्यंत हा विषाणू पोहोचू शकत नाही, अशी माहिती प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. चैतन्य शेंबेकर व्यक्त केला आहे.

गर्भाशयाचे प्लॅसेंटल बॅरियर हा विषाणू पार करीत नाही आणि अशाप्रकारे चीन किंवा इतर देशात गर्भवतींच्या बाळापर्यंत विषाणू पोहोचण्याचे प्रकरण अद्याप तरी समोर आलेले नाही, अशी माहिती त्यांनी दिली.

कोरोना विषाणूचा प्रसार सर्वत्र वेगाने होत असताना गर्भवती असलेल्या महिलांमध्ये पोटातील बाळाला काही समस्या निर्माण होतील का, या शंकेमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. या विषाणूची लागण झाली तर कसे होईल, पोटातील बाळाला या विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे का? प्रसुतीमध्ये काही समस्या निर्माण होतील का? गर्भपाताचा (अबॉर्शन) प्रसंग येतो का? डॉक्टरांशी कसे भेटावे? अशा नानाविध प्रश्नांची गर्दी त्यांच्या मनात आहे. त्यामुळे त्यांची भीती वाढली असून डॉक्टरांना याबाबत विचारणा केली जात आहे.

प्रसूती तज्ज्ञांनी याप्रकारची कुठलीही शक्यता नाकारली आहे. बाधित महिलेच्या पोटातील बाळापर्यंत संसर्ग पोहोचण्याचे कोणतेही प्रकरण सध्यातरी समोर आले नाही.  त्यामुळे या शंका घेऊन घाबरण्याचे कारण नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

खर तर गर्भवती महिलांची रोग प्रतिकारशक्ती सामान्य माणसांपेक्षा आधीच कमी असते. त्यामुळे केवळ कोरोना नाही तर कोणतेही आजार किंवा विषाणूचा संसर्ग होण्याची सर्वाधिक शक्यता गर्भवती महिलांनाच असते. त्यामुळे काळजी घेण्याचीही त्यांनाच सर्वाधिक गरज असते. विलगीकरण केल्याने व काळजी घेतल्याने कोरोनाची लागण होण्याचा धोका अधिक आहे.

गर्भवती महिलेला मधुमेह किंवा अस्थमाचा आजार असेल तर हा धोका अधिक प्रमाणात वाढतो. त्यामुळे सामान्य माणसांप्रमाणेच काळजी घ्यावी. पण गर्भवती असल्याने इतरांशी कमीतकमी संपर्क येईल, असे प्रयत्न करावे. बाळाच्या हालचालीकडे लक्ष ठेवा आणि रक्तस्त्राव, पाणी जाणे, पोटात दुखणे (लेबर पेन) आदी आकस्मिक गरज वाटल्यास त्वरीत डॉक्टरांना भेटा आदी सूचना त्यांनी दिल्या आहेत. गर्भधारण व प्रसुती कायमच आपात्कालिन असते, त्यामुळे शक्यतो सर्व प्रकारची काळजी घेउन या परिस्थितीत स्वत:ला सांभाळा, असे आवाहन त्यांनी केले.

यशस्वी उपचारांमुळे बरे झाले यवतमाळातील कोरोनाचे रुग्ण, मिळाला डिस्चार्ज

 - गर्भवती महिलांची रोग प्रतिकारशक्ती इतरांपेक्षा कमी असते. त्यामुळे कोणत्याही विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो.
 - सामान्य व्यक्तिंप्रमाणेच काळजी घ्यावी, पण इतरांशी कमीतकमी संपर्क येईल यासाठी वेगळे राहण्याचा (आयसोलेट) प्रयत्न करावा.
 - कमीतकमी बाहेर निघा, गर्दीत अजिबात जाऊ नका.
 - प्रवास करू नका, नोकरीपेशांनी घरूनच काम करावे.
 - भरपूर पाणी प्या (हायड्रेशन). सर्दी, ताप, खोकला असेल तर त्वरित डॉक्टरांना दाखवा.
 - मधुमेह किंवा अस्थमाचा त्रास असलेल्यांनी अधिक काळजी घ्यावी.
 - नियमित तपासण्यांसाठी रुग्णालयात जावे. सुदृढ असलेला एकच व्यक्ती सोबत असावा, रुग्णालयात अनावश्यक गर्दी करू नये.
 - बाळाचे एका तासात ५ ते ६ वेळा हालचाली होतात, त्याकडे बारकाईने लक्ष द्या.
 - बाळाच्या हालचाली, रक्तस्त्राव, पाणी जाणे किंवा पोटात दुखण्याचा त्रास जाणवल्यास त्वरित डॉक्टरांना भेटा.
 - प्रसुती ही कायमच आकस्मिक असते, त्यामुळे काळजी घ्या, घाबरू नका.

घाबरू नका, काळजी घ्या
कोरोनाचा धोका गर्भवतींना जास्त असला तरी घाबरू नका, थोडासा खोकला वा ताप असल्यास फोनवरून विचारणा करा. सात ते नऊ महिने सुरू असलेल्या गर्भवतींनी अधिक कळजी घेणे गरजेचे आहे. महिलेची प्रसुती झाल्यावरही नतेवाईकांनी गर्दी न करता काळजी घ्यावी. 
- डॉ. चैतन्य शेंबेकर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: health tips for pregnant womens about corona virus