मोफत लस मिळूनही आरोग्यसेवकांची पाठ; अनेकांनी उचलले नाही फोन; केवळ २७० जणांचा प्रतिसाद  

राजेश प्रायकर 
Saturday, 16 January 2021

महापालिकेच्या पाचपावली सुतिकागृह केंद्रातील कोव्हीड लसीकरण केंद्रात आज सकाळी महापौर दयाशकंर तिवारी यांच्या उपस्थितीत पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. यासोबतच मेयो,

नागपूर ः कोव्हीड लसीसाठी नोंदणी करण्याचे टाळणारे शहरातील आरोग्यसेवकांनी आज लसीकरणाच्या पहिल्या दिवशी वेगवेगळे कारणे पुढे करीत लस घेण्याचेही टाळले. शहरातील पाच केंद्रांवर केवळ २७० जणांनी लसीकरण मोहिमेला प्रतिसाद दिला. नागपुरातील पाचही केंद्रावर पहिल्या दिवशी ४८५ जणांचे लसीकरण अपेक्षित होते. लसीकरण करणाऱ्यांतही महिला आरोग्यसेवकांनीच आघाडी घेतली आहे.

महापालिकेच्या पाचपावली सुतिकागृह केंद्रातील कोव्हीड लसीकरण केंद्रात आज सकाळी महापौर दयाशकंर तिवारी यांच्या उपस्थितीत पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. यासोबतच मेयो, मेडिकल, डागा रुग्णालय, एम्स या ठिकाणीही एकाचवेळी लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. मनपाच्या पाचपावली सुतिकागृहातील केंद्रावर तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपांकर भिवगडे यांना ०.५ मिलीची पहिली लस देण्यात आली. 

जाणून घ्या - १८ वर्ष होवूनही झालं नाही बाळ, पती घरी येताच पत्नी मोठ्यानं किंचाळली अन् घडला थरार

या केंद्रावर ८५ जणांना कोरोना लस देण्याचे ठरले होते. परंतु सायंकाळपर्यंत ५९ जणांनी लस घेतली. या केंद्रावरून नोंदणी करण्यात आलेल्यांना फोन केला असता १० जणांनी फोनच उचलला नसल्याचे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नमूद केले. याशिवाय ज्यांनी फोन उचलले त्यांनी शहराबाहेर असल्याचे कारण पुढे करून लसीकरण टाळले. तीन महिला आरोग्य सेविका गर्भवती असल्याने तसेच दोघांना खोकला असल्याने लस नाकारण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्याने स्पष्ट केले. या केंद्रावर ३६ जणांनी लस नाकारल्याचे एकूणच दिसून येत आहे.

मेडिकल, मेयो, डागा व एम्समध्ये प्रत्येकी १०० आरोग्यसेवकांना लस देण्यात येणार होती. परंतु, या पाचही केंद्रांवर सकाळपासूनच थंड प्रतिसाद पाहायला मिळाला. मेडिकल तसेच डागा हॉस्पिटलमध्ये प्रत्येकी ५३, मेयोत ३७ तर एम्समध्ये सर्वाधिक ६८ जणांना लस देण्यात आली. काही डॉक्टरांनी चक्क कोव्हॅक्सिनची लस नाकारली. सुशिक्षित डॉक्टरांकडूनच लसीच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. विशेष म्हणजे आज सर्व शासकीय आरोग्य संस्थेतील आरोग्यसेवकांना लस देण्यात आली. खाजगीतील कुणालाही लस देण्यात आली नाही. पहिल्या दिवशी १२७ पुरुषांना तर १४३ महिलांना लस देण्यात आली.

लसीकरणानंतर काहींना भोवळ

लसीकरणानंतर अर्धा तास आरोग्यसेवकांना निरीक्षण कक्षात ठेवण्यात आले. लसीकरणानंतर काहींना भोवळ आली. परंतु, ती काही वेळासाठीच होते. अनेकांनी काहीही त्रास झाला नसल्याचे सांगितले. पाचपावली येथील डॉ. वैशाली मोहकर यांनी लसीकरणानंतर काहीही त्रास नसून कोव्हिडपासून बचावासाठी लस उपयुक्त असल्याचे सांगितले.

चार दिवस लसीकरण

उद्‌घाटनानंतर पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी प्रत्येक केंद्रावर आठवड्यातून चार दिवस लसीकरण होणार असल्याचे सांगितले. प्रत्येक दिवशी प्रति केंद्र १०० व्यक्तींना लस देण्यात येणार आहे. लस घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या संपर्कात आरोग्य यंत्रणा राहणार आहे. २८ दिवसानंतर दुसरा डोज देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

२६ कुपींचा वापर

प्रत्येक आरोग्यसेवकांना ०.५ मिली लस देण्यात आली. यासाठी लस असलेल्या एकूण २६ कुपींचा वापर करण्यात आला. पाचशे आरोग्यसेवकांसाठी विविध केंद्रांवर एकूण ४६ कुपी देण्यात आल्या होत्या. यात मेडिकलमधील केंद्रावर कोव्हॅक्सिन कंपनीच्या सहा तर इतर चार केंद्रांवर कोव्हीशिल्ड कंपनीच्या प्रत्येकी १० कुपी देण्यात आल्या.

अधिक वाचा - बापरे! जीवंत रुग्णाचे पाय पोहोचले थेट शवागारात अन् सत्य समोर येताच उडाली तारांबळ   

लस घेण्याचा अनुभव सुखद होता. लस घेतल्यानंतर कुठलाही त्रास जाणवला नाही. ही लस घेण्यात कुठलाही धोका नसून ज्यांनी नोंदणी केली, त्यांनी कुठलीही भीती मनात न बाळगता लस घ्यावी.
- डॉ. दीपांकर भिवगडे, 
वैद्यकीय अधिकारी, महापालिका.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Health workers denied to take vaccine even though it is free in Nagpur