
सक्रांतीच्या दिवशी दुपारी जोत्सना या घरात झोपलेल्या होत्या. त्यावेळी आरोपी हा मद्यधुंद अवस्थेत घरी आला. शेजारच्यांना शिविगाळ करीत होता.
नागपूर : लग्नाला १८ वर्षे झाल्यानंतरही मुलबाळ होत नसल्यामुळे शासकीय अधिकारी असलेल्या पतीने शिक्षक असलेल्या पत्नीवर बंदूकितून छर्रा चालवून पत्नीला ठार करण्याचा प्रयत्न केला. ही घटना सक्रांतीच्या दिवशी दुपारी दीड वाजता एमआयडीसीत घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. जोत्सना किशोर रामटेके (वय ४५, रा. माधवनगरी, इसासनी) असे जखमी पत्नीचे नाव आहे. किशोर हरिश्चंद्र रामटेके (वय ४७) असे पतीचे नाव आहे.
हेही वाचा - हिंगणघाट जळीतकांड : ...अन् अंकिताच्या आईला रडू कोसळले; भावूक झाल्याने १५ मिनिटे कामकाज थांबले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किशोर रामटेके हा सार्वजनिक बांधकाम विभागात आरेखक पदावर कार्यरत आहे, तर त्याची पत्नी जोत्सना या एका नामांकित शाळेत शिक्षिका आहेत. २००२ साली दोघांचा विवाह झाला. दोघांचाही सुखी संसार सुरू होता. लग्नाला पाच वर्षे झाले तरी त्यांना मुळबाळ होत नव्हते. त्यामुळे दोघांनीही दवाखाने आणि देवदर्शन केले. तरीही त्यांना मुलबाळ होत नव्हते. त्यामुळे दोघे नैराश्यात होते. बाळ नसल्यामुळे किशोरने नातेवाईकांकडे जाणे बंद केले. तसेच जोत्सना यांनीही मित्र-मैत्रिणींकडे येणे-जाणे बंद केले होते. लग्नाला १८ वर्षे झाल्यांनंतररी बाळ होत नसल्यामुळे निराश झालेला किशोर दारुच्या आहारी गेला होता. दररोज दारू पिऊन तो घरी भांडण करायचा. सक्रांतीच्या दिवशी दुपारी जोत्सना या घरात झोपलेल्या होत्या. त्यावेळी आरोपी हा मद्यधुंद अवस्थेत घरी आला. शेजारच्यांना शिविगाळ करीत होता. त्यानंतर तो घरात आला व त्याने बंदूक पत्नीच्या गळयावर लावून छर्रा चालवला. यात ती गंभीर जखमी झाली. किंचाळण्याचा आवाज ऐकून समोर राहणारे कुटुंब मदतीसाठी धावले. त्यांनी ताबडतोब जोत्सना यांना जवळच्या लता मंगेशकर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी उपचार करून पोलिसांना माहिती दिली.
हेही वाचा - महिलांनो! यंदा वाणाचे ट्रेंड बदलले, हळदी-कुंकू लावताना स्पर्श टाळण्यासाठी हटके ट्रिक्स
किशोरला घरातूनच अटक -
किशोर आणि जोत्सना हे कुटुंबीयांपासून अलिप्त राहात होते. त्यांचे शेजारी-मित्रमंडळीसोबतही संबंध नव्हते. तीन महिन्यांपूर्वी किशोरची बदली नागपुरातून गडचिरोली येथे झाली. तो गडचिरोलीहून ये-जा करीत होता. त्याला दारूच्या व्यसनाने गाठले होते. पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न केल्यानंतर तो घरातच बसून होता. पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून आरोपीला घरातूनच अटक केली.