(Video) टोळधाड आल्याचे समजताच गृहमंत्री रात्रीच शेतकऱ्यांच्या बांधावर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

शनिवारी सायंकाळी टोळधाडीने काटोल तालुक्‍यातील कचारी सावंगा, सोनपूर, गणेशपूर, शेकापूर आदी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान केले.

नागपूर : नागपूर जिल्ह्यात टोळधाडीने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यापासून बचावासाठी कृषी विभागाने योग्य त्या उपाययोजना कराव्या, तसेच शेतकऱ्यांनीही सतर्क रहावे, अशा सूचना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्या.

शनिवारी सायंकाळी टोळधाडीने काटोल तालुक्‍यातील कचारी सावंगा, सोनपूर, गणेशपूर, शेकापूर आदी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान केले. ही माहिती मिळताच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रात्री साडेनऊ वाजता टोळधाड असलेल्या भागात पाहणी केली.

तसेच त्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने फवारणी तसेच योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. जेणेकरून टोळधाडीपासून शेतकऱ्यांचे पीक, फळबागा, भाजीपाला वाचू शकेल वा कमीत कमी नुकसान होईल. नुकसानीची पाहणी करताना त्यांच्यासोबत कृषी विभाग, महसूल विभागासोबतच स्थानिक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

नरखेड तालुकयात टोळधाडीच्या आक्रमणामुळे सावनेर तालुक्‍यातही या कीटकांचे थवे येण्याची शकयता वर्तविली जाताना अचानक पाचच्या सुमारास मौदा, रामटेक, पारशिवनीमार्गे अपेक्षेपेक्षा जास्त टोळकीटकांनी पानेगाव, खापा, आदमी शिर्डी, ठाणगाव, खुरगाव, परसोडी, उमरी पंढरी, जलालखेडा आदी भागांमध्ये धुमाकूळ घातला. त्यामुळे प्रशासन व आधीच धास्तावलेल्या शेतकऱ्यांची झोपच उडाली आहे.
 

तुकाराम मुंढे हुकुमशाहसारखे वागतात, नागपुरातील या कॉंग्रेसे आमदाराने डागली तोफ

 

अडीच महिन्यांची सायकल

गुजरात आणि राजस्थान या राज्यात डिसेंबर महिन्यात टोळधाडीचा हल्ला दिसून आला. त्यानंतर नागपुरात मध्य प्रदेश मार्गाने दाखल झाल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार टोळधाडीचे जीवनमान अडीच महिन्यांच्या कालावधीचे असते. यादरम्यान प्रजनन आणि विकसित होण्याची प्रक्रिया सुरू असते. विशेष म्हणजे ज्या किड्यांचा रंग गुलाबीपासून पिवळा होत असतो, त्या मादी समागम करण्यासाठी तयार असतात. त्यानंतर त्यांची प्रजनन प्रक्रिया सुरू होत असल्याचे सांगितले जाते. शुष्क भागात अधिक प्रमाणात विकसित होत असल्याने त्या या भागाचा शोध अधिक घेताना दिसून येतात. उष्ण तापमानाचा त्यांच्यावर परिणाम होत नाही.

 

शेतकरी, ग्रामस्थांनी टोळधाडीपासून बचाव करण्यासाठी बॅंन्ड, फटाके यांचे मोठे आवाज करावे. तसेच मोठ्या प्रमाणात धूर करावा. त्यामुळे टोळधाडीपासून बचाव करू शकतो. याशिवाय कृषी विभागही आपल्या सर्व ते प्रयत्न करीत आहेत.
अनिल देशमुख, गृहमंत्री महाराष्ट्र राज्य


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home Minister Anil Deshmukh inspected the locust damage last night