गृहमंत्री अनिल देशमुख यांचे भूखंड माफियांविरुद्ध मोठे विधान.. म्हणाले..

अनिल कांबळे    
Saturday, 5 September 2020

देशमुख म्हणाले, शहरात आता एकही नामांकीत गुंड नाही. सर्व गुंडांवर ताबडतोब कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे गुंड आता कारागृहातच डांबलेले दिसतील.

नागपूर : उपराजधानीत भूखंड माफियांनी प्रस्थ निर्माण केले असून जमीन बळकावण्याच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली आहे, भूखंड माफियांवर अंकूश कसण्यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्याचे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नवनियुक्त पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना दिले. त्यामुळे आता भूखंडमाफियांची खैर करण्यात येणार नाही. नागपूरचे माजी पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांना गृहमंत्र्यांच्या हस्ते पोलिस जीमखाना येथे शनिवारी निरोप देण्यात आला, यावेळी देशमुख बोलत होते.

देशमुख म्हणाले, शहरात आता एकही नामांकीत गुंड नाही. सर्व गुंडांवर ताबडतोब कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे गुंड आता कारागृहातच डांबलेले दिसतील. जर एखादा गुंड शहरात फिरत असेल, तर माझ्या कार्यालयाला कळवा, त्याच्यावर नक्‍की कारवाई करण्यात येईल. मुंबईप्रमाणे नागपूर शहर पोलिस दलात उच्च दर्जाच्या ड्रोनचा समावेश करण्यात येणार आहे. जेणेकरून शहरावर तिसऱ्या डोळ्याने नजर ठेवता येईल.

हेही वाचा - काय सांगता! जर्मनीने युद्धात शस्त्र म्हणून केला होता डासांचा वापर; जाणून घ्या डासांबद्दलच्या माहिती नसलेल्या गोष्टी

काही दिवसांपूर्वीच रवी भवन येथे तक्रार शिबिर घेण्यात आले. यावेळी ३५० तक्रारी प्राप्त झाल्या. सर्वाधिक तक्रारी या भूखंड बळकावल्याच्या आहेत. भूमाफियांविरुद्ध कारवाईसाठी यापूर्वीही एसआयटी स्थापन करण्यात आली. त्याच धर्तीवर पुन्हा एसआयटी स्थापन करुन पीडितांना त्यांचे भूखंड परत मिळवून देण्याचा प्रयत्न पोलिसांनी करावा. नागपूर पोलिसांनी गुन्हे नियंत्रणात आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नागपूरला लागलेल्या क्राइम कॅपिटलचा डाग त्यांनी पुसून काढला. 

मकोकाची कारवाई करून कुख्यात गुंडांना कारागृहात डांबले. गृहमंत्र्यांच्या हस्ते डॉ. उपाध्याय व डॉ. शशिकांत महावारकर यांना शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन निरोप देण्यात आला. संचालन गुन्हेशाखेचे उपायुक्त गजानन राजमाने यांनी केले. वाहतूक शाखेचे उपायुक्त विक्रम साळी यांनी आभार मानले. यावेळी पोलिस सहआयुक्त नीलेश भरणे व सर्वच पोलिस उपायुक्त उपस्थित होते.

लोकाभिमुख पोलिसिंगवर भर

लोकाभिमुख पोलिसिंगवर आपला भर राहील. सांघिक प्रयत्नातून नागपूरला ‘क्राइम फ्री’ सिटी करण्यासह पोलिसांची प्रतिमा अधीक उजळ करण्याचा आपण प्रयत्न करु. पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले,

पाच वेळा काम करण्याची संधी - डॉ. उपाध्याय

आपल्या कार्यकाळात एकाच शहरात पाच वेळा काम करण्याची संधी मिळणे आणि चक्क गृहमंत्र्यांच्या हस्ते निरोप मिळणे हे माझे सौभाग्य समजतो. दोन वर्षांच्या कार्यकाळात गुन्हे नियंत्रणात आणून शांतता प्रस्थापित करण्यात यश आले. हे माझे एकट्याचे यश नसून यामध्ये प्रत्येक पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. नागपूरकर प्रेमळ व शांतता प्रिय आहेत. तुम्ही नागपूरकरांवर प्रेम करा ते नक्कीच तुमच्यावर प्रेम करतील, असा सल्लाही डॉ. उपाध्याय यांनी नवनियुक्त पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना दिला.

अधिक माहितीसाठी - भावी लष्करी अधिकार्यांच्या सुविधेसाठी लालपरी सज्ज, तब्बल एवढ्या फेर्या

महिला बटालियन स्थापन करणार

नागपुर जिल्ह्यातील काटोलमध्ये राज्य राखीव पोलिस दलाची महिला बटालियन स्थापन करण्यात येणार आहे. महिला शक्ती वाढवणे आणि महिलांना समान दर्जा मिळेल. तसेच पोलिस दलात आमुलाग्र बदल करण्यादर भर देण्यात येईल. कोरोना काळात पोलिसांनी खूप परीश्रम घेतले. दुर्दैवाने आमचे १६५ पोलिस कर्मचारी शहिद झाले, असेही गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: home minister Anil Deshmukh made a big statement against plot mafia