हॉटेल पूर्ण क्षमतेने सुरू होण्यास लागणार सहा महिने 

राजेश रामपूरकर
Monday, 5 October 2020

 हॉटेल सुरू करण्याची शासनाने परवानगी दिली असली तरी मार्गदर्शक सूचनाही आलेल्या आहेत. त्याचे पालन करून हॉटेल्स सुरू करण्यात येणार येत आहेत. शहरातील विविध हॉटेलमध्ये सुमारे पन्नास हजार कर्मचारी होते. सध्या ५० टक्के क्षमतेने हॉटेल सुरू करण्यासाठी किमान २० हजार कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. कर्मचारी गावी निघून गेल्यामुळे हॉटेल सुरू करताना मनुष्यबळाची कमतरता भेडसावणार आहे.

नागपूर :  साडेसहा महिन्यांनंतर शहरातील हॉटेल सुरू करण्यास परवानगी मिळाली असली तरी पूर्ण क्षमतेने हॉटेल सुरू होण्यासाठी पाच ते सहा महिने लागणार आहेत. कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गरजेनुसार कामगारांना बोलविण्यात येणार आहे. हॉटेलसाठी असलेल्या नियमांची अंमलबजावणी करून टेबल लावणे, सॅनिटायझेशन, काउंटरवर कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पारदर्शक काच लावण्याचे काम सुरू आहे. 

टाळेबंदीचा सर्वाधिक फटका हॉटेल व्यावसायिकांना बसला. तब्बल साडेसहा महिन्यांच्या खंडानंतर उद्या सोमवारपासून (५ ऑक्टोबर) हॉटेल आणि परमिट बार सुरू करण्यासाठी राज्य शासनाने परवानगी दिली आहे. तरी हॉटेलच्या जागेचे भाडे आणि मनुष्यबळाची कमतरता, ग्राहक किती येतील यासह इतरही अडचणीचा सामना करावा लागणार आहे. हॉटेल सुरू करण्याची शासनाने परवानगी दिली असली तरी मार्गदर्शक सूचनाही आलेल्या आहेत. त्याचे पालन करून हॉटेल्स सुरू करण्यात येणार येत आहेत. शहरातील विविध हॉटेलमध्ये सुमारे पन्नास हजार कर्मचारी होते. सध्या ५० टक्के क्षमतेने हॉटेल सुरू करण्यासाठी किमान २० हजार कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. कर्मचारी गावी निघून गेल्यामुळे हॉटेल सुरू करताना मनुष्यबळाची कमतरता भेडसावणार आहे. 

धोकादायक! कोरोनाचा हृदयाच्या पेशींवर परिणाम; हृदयरोग तज्ज्ञ डॉ. जगताप यांचा महत्वाचा सल्ला

ग्राहकांची संख्या वाढल्यानंतर अजून कामगारांना बोलावण्यात येणार आहे. कारण कामगारांचे पगार देण्यासाठी हॉटेल चालकाकडेही आता पैसा राहिलेला नाही. शहरात दोन हजारपेक्षा अधिक हॉटेल्स असून त्यातील ३५० च्या जवळपास हॉटेल्सची नोंदणी असोसिएशनकडे आहे. सरकारने उशिरा का होईना हॉटेल्स सुरू करण्याची परवानगी दिली आहे याचे स्वागत आहे. असे नागपूर हॉटेल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश दवे यांनी सांगितले.

 

हॉटेल्सने मेन्यूचा आकार कमी केलेला नाही

सरकारने दिलेल्या आदेशानुसार हॉटेलमध्ये टेबल लावणे आणि सॅनिटायझेशन करण्यात येत आहे. शहरामधील हॉटेल्सने मेन्यूचा आकार कमी केलेला नाही. जुनाच मेन्यू ठेवला असून ग्राहकांना चांगली सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे.   गुड्डू तिवारी, आर. आर. हॉटेल्स 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Hotels will Opens at Full Capacity After Six Months