कशी आहे पदवी प्रवेशाची स्थिती? प्रथमच संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी, वाचा सविस्तर...

मंगेश गोमासे
Friday, 14 August 2020

२० ते २४ ऑगस्टदरम्यान गुणवत्ता यादीनुसार प्रवेश दिल्या जाणार आहे. २५ ते २८ ऑगस्टदरम्यान प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्या जातील. या प्रवेशानंतर महाविद्यालयात थेट प्रवेशास सुरुवात करण्यात येईल. यादरम्यान विद्यापीठाची नोंदणी सुरू राहणार आहे.

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे पदवी प्रवेशासाठी संकेतस्थळावर नोंदणी करणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे शेवटल्या दिवसापर्यंत ८८ हजारावर विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर नोंदणी केली. यापैकी ६६ हजारावर विद्यार्थ्यांनी अर्ज निश्चिती केली आहे. आता १७ तारखेला दुपारी १२ वाजता गुणवत्ता यादी आणि प्रतिक्षा यादी प्रकाशित करण्यात येईल.

विद्यापीठाने यावर्षी पदवी प्रवेशासाठी प्रथमच संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करीत, दहावी आणि बारावीची गुणपत्रिका अपलोड करण्याचे अनिवार्य केले. या विरोधात प्राचार्य फोरम यांचेसह प्राधीकरण सदस्यांनी विरोध दर्शविला होता. तसेच, पदव्युत्तर प्रवेशामध्ये ऑनलाइन प्रवेश केल्याने महाविद्यालयांना फटका बसल्याची बाब समोर केली होती. कोरोना काळात टाळेबंदी असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा फटका बसेल असेही सांगण्यात आले आहे. १७ जुलैपासून सुरू झालेल्या नोंदणीचा आकडा अंतिम दिवस १२ ऑगस्टपर्यंत ८८ हजारावर गेला आहे.

जाणून घ्या - शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले हे विधान...

आता १७ तारखेला १२ वाजता गुणवत्ता यादी आणि प्रतिक्षा यादी प्रकाशित करण्यात येईल. यानंतर २० ते २४ ऑगस्टदरम्यान गुणवत्ता यादीनुसार प्रवेश दिल्या जाणार आहे. २५ ते २८ ऑगस्टदरम्यान प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्या जातील. या प्रवेशानंतर महाविद्यालयात थेट प्रवेशास सुरुवात करण्यात येईल. यादरम्यान विद्यापीठाची नोंदणी सुरू राहणार आहे.

नोंदणीच्या तारखेत वाढ करा - प्राचार्य फोरम
विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी १२ ऑगस्ट अंतिम तारीख होती. मात्र, यादरम्यान अनेक विद्यार्थी नोंदणीस मुकले आहे. यामुळे नोंदणीच्या तारखेत वाढ करण्यासाठी प्राचार्य फोरमतर्फे उद्या कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांची भेट घेणार आहे. यादरम्यान प्राचार्य फोरम कुलगुरूंना निवेदन सादर करतील अशी माहिती अध्यक्ष डॉ. टाले यांनी दिली आहे.

ठळक बातमी - बापाची मुलीला आर्त विनवणी, 'बेटा मला येथून काढ, नाही तर मी मरून जाईन, मला जगायचे आहे तुमच्यासाठी'

असे आहे वेळापत्रक

 • १७ ऑगस्ट - गुणवत्ता यादी आणि प्रतिक्षा यादीचे प्रकाशन
 • २० ते २४ ऑगस्ट - गुणवत्ता यादीनुसार प्रवेश
 • २५ ते २८ ऑगस्ट - प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश
 • २८ ऑगस्टनंतर - थेट प्रवेश
 • विद्यापीठामधील शाखानिहाय जागा

  • कला - 40,000
  • वाणिज्य - 30,000
  • विज्ञान - 35,000
  • विधि - 1,500
  • गृहविज्ञान - 400
  • गृहअर्थशास्त्र - 500

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How is the degree admission status

Tags
टॉपिकस